विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकनाथ शिंदे यांना साथ देणारे जवळपास सर्वच आमदार पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले. काही त्याला अपवाद राहीले. शिंदे यांना साथ देणाऱ्या एका ही आमदाराला पडू देणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. पण तसं झालं नाही. सांगोला विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद ठरला. शिंदे सेनेचे शहाजीबापू पाटील हे पराभूत झाले. आपल्या बरोबरचे सर्व जण जिंकले पण आपण पराभूत झालो ही सल त्यांच्या मनाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता थेट राजकीय निवृत्तीबाबतच वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र ही घोषणा करण्या मागेही काही तरी कारण आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगोला हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. अशा स्थितीत सांगोल्याला सहा महिन्यात पाणी आले नाही तर आपण राजकीय निवृत्ती घेवू अशी घोषणाच शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. सांगोल्यातील 14 गावातील शेतात पाणी आलं नाही, तर राजकीय निवृत्ती जाहीर करेन असं ते म्हणाले आहे. जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार असल्याचंही ते म्हणाले. विधानसभेच्या पराभवानंतर सांगोला तालुक्यातील चिकमहुद या गावी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत शहाजी बापू पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे.
शहाजीबापू पराभूत झाल्यानंतर भावूक झाले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आपल्या भावनेला वाट करून दिली. मृत्यूच्या दाढेत असताना ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला होता. उजनीची एक पाईल क्लिअर करा अशी विनंती केली होती. निवडणूक लागल्यावर हे लांबणीवर पडेल. त्या फाईलवर सही झाली. फडणवीसांमुळे तातडीने वर्क ऑर्डर ही निघाली. टेंडर काढलं. त्यावेळी जर केवळ जिवंत राहण्याचा विचार करत राहीलो असतो तर हे काम झालं नसतं असंही ते यावेळी म्हणाले. पुढच्या सहा महिन्यात हा भाग हिरवागार करणार आहे. तेच आपल्यासाठी सुख आहे असं शहाजीबापू यावेळी म्हणाले.
दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या पराभवाचा डाव रचला होता असे म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला मुंबईमध्ये येऊ द्यायचे नाही यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांनी पण केला होता. त्यात माझे मित्र दीपक आबा साळुंखे हे त्यांच्या डावात फसले. मतविभागणीमुळे माझा पराभव झाला असा गंभीर आरोप सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. मात्र आपण खचून जाणार नाही, असंही ते म्हणाले. जनतेसाठी काम करत राहणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world