संकेत कुलकर्णी, सांगोला: विधानसभा निवडणुकीत सांगोल्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दर्शवला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये मला मुंबईमध्ये येऊ द्यायचे नाही यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांनी पण केला होता. त्यात माझे मित्र दीपक आबा साळुंखे हे त्यांच्या डावात फसले. मतविभागणीमुळे माझा पराभव झाला असा गंभीर आरोप सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. निवडणूक निकालानंतर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
नक्की वाचा: शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा का सोडला? दिल्लीत पडद्या मागे काय घडलं?
तसेच माझा पराभव करण्यासाठी उध्दव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांनी निवडणूक हाताळली. कोणत्याही परिस्थितीत मी मुंबईत येणार नाही यासाठी त्यांनी पण केला होता. असा आरोप ही त्यांनी केला. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या ईव्हीएमवरील आरोपांवरुनही शरद पवारांवर निशाणा साधला.
ईव्हीएम मशीन बाबत हरल्यानंतर बोलतात. यामध्ये पवार साहेबांसारख्या जाणकार नेत्यांनेही सहभाग घ्यावा. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अशी टीका शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी केली. महाराष्ट्रात आजपर्यंत संजय राऊत जे बोलला ते लबाड थोबाड निघालं आहे. त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे शहाजी बापू पाटील हे प्रचंड चर्चेत आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे सांगोला विधानसभेच्या निकालाकडे लक्ष लागले होते. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे आणि शेकापचे बाबासाहेब देशमुक यांचे आव्हान होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world