बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे याचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. जाटनांदूर इथल्या प्रचार सभेत पंकजा यांनी पहिल्यांदाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना त्यांचे नाव न घेता लक्ष्य केले आहे. जरांगे पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी मराठा उमेदवारालाच मतदान करा असे आवाहन समाजाला केले होते. हा धागा पकडत पंकजा यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे यांच्यावर पंकजा मुंडे या पहिल्यांदाच जाहीर पणे बोलल्या आहेत. बीड लोकसभा मतदार संघात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मतं आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत वेगवेगळी चर्चा होत आहेत.
जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल
कोणी कितीही भाषणं ठोकले आणि कितीही आमरण उपोषण केले तरी कायदा बदलत नसतो. अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुनावले आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्यात राजकारण आणण्याचं काहीही कारण नाही असंही त्या म्हणाल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी उपोषण आणि जाहीर सभांचा मार्ग अवलंबला होता. त्या पार्श्वभूमीवर पंकजा बोलत होत्या. शिवाय जरांगे यांनी मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करा असे आवाहन केले होते. दरम्यान यात राजकारण करू नये असे पंकजा म्हणाल्या.
'निवडणूक हे महायुद्ध'
निवडणूक हे महायुद्ध आहे. म्हणूनच मला यात उतरवण्यात आलं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मला दिल्लीला जाण्याची हौस आली म्हणून निवडणूक लढवत नाही. उमेदवारी मिळावी म्हणून कोणाच्या दारात गेली नाही. पण बीडचा विकास करायचा आहे त्यामुळे ही निवडणूक लढवत असल्याचं ही त्या म्हणाल्या. एखाद्याला एकदा शब्द दिला तर मान कापून दिली तरी शब्द बदलत नाही, हा आपला स्वभाव असल्याचं त्यांनी सांगितलं. स्त्रियांमध्ये देखील शौर्य असतं. शौर्यां बरोबर धैर्य असतं. आजची निवडणूक हे महायुद्ध आहे. म्हणूनच मला यात टाकलं आहे. रथी महारथी आहेत. ही निवडणूक बीड जिल्ह्याचा अस्मितेची आहे असंही त्या शेवटी म्हणाल्या.
'कधी कोणाची जात विचारणार नाही'
बीड जिल्ह्याची जनता विकासाच्या पाठीशी राहील, असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला. मोदीजींना हाक मारली तर बोल पंकजा असं उत्तर त्यांच्याकडून मिळेल. त्यातून विकास होईल. यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. माझ्या दारात आलेल्या व्यक्तीची जात आणि आडनाव कधीच विचारणार नाही. माझ्या हातात तराजू आहे. ज्याच्या हातात तराजू असतो त्याच्या डोळ्यावर पट्टी असते. पण माझ्या डोळ्यावर पट्टी नाही. मला काही मिळवायचं नाही. मला कशाची कमी नाही. जिल्ह्याचा चेहारा मोहरा बदलायला आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साथ द्या, अस आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world