मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठींबा देऊ केला. त्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवर विरोधकांनी सडकून टिका केलीच पण मनसेच्या अनेक मावळ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्रही केला. सोशल मीडियावर तर टिकेचा भडीमार सुरू झाला. ठाकरेंचे जुने व्हीडिओ बाहेर आले. यासर्वांना उत्तर देण्याची रणनिती मनसेनं आखली आहे.
राज ठाकरे उत्तर देणार?
राज ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीं विरोधात भूमिका घेतली होती. लाव रे तो व्हिडीओनं सर्व वातावरण ढवळून निघालं होतं. राज यांच्या त्यावेळच्या सभांचं संपुर्ण भारतात चर्चा होती. मात्र राज यांना ईडीची नोटीस आली, त्यानंतर सर्व चित्रच पालटलं. राज यांच्या टिकेची झोड कमी झाली. येवढचं नाही तर युटर्न घेत त्यांनी भाजप बरोबर जवळीकही केली. लोकसभा निवडणूक भाजप बरोबर लढावी अशी त्यांची रणनिती होती. पण त्यांना जागा सोडल्या गेल्या नाहीत. अशा स्थितीतही त्यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा देत कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचा आदेश दिली. मात्र त्यांचा हा निर्णय अनेकांना पटला नाही. त्यांनी थेट राज यांनाचं लक्ष केलं. या टिकेला आता राज उत्तर देणार असल्याचं समजत आहे. शिवाय राज यांचे जुने व्हिडीओ ज्या पद्धतीनं व्हायरल होत आहेत तसेच काही महाविकास आघाडीचे व्हिडीओ ही बाहेर काढण्याचा मनसेचा प्लॅन आहे.
पक्षाच्या सरचिटणिसानं दिला राजीनामा
बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर पहील झटका राज यांना पक्षातूनच मिळाला. पक्षाचे सरचिटणिस किर्तीकुमार शिंदे यांनी पदाचा राजिनामा दिला. शिवाय राज यांनी घेतलेल्या भूमिकेवरही टिका केली. त्यांनी घेतलेली भूमिकाही नपटणारी आहे असं त्यांनी राजिनामा देताना म्हटलं होते. त्यानंतर राज्यभरातून राजिनामा सत्र सुरू झालं. हा राज ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे. यापार्श्वभूमिवरही राज काय बोलतात याकडे राजकीय वर्तूळाचं लक्ष लागलं आहे.
मनसेची शनिवारी होणार बैठक
सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसेनं तातडीची बैठक बोलवली आहे. ही बैठक शनिवारी एमआयजी क्लबमध्ये होणार आहे. पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. राज ठाकरे या बैठकीत पुढील रणनिती निश्चित करणार असल्याचं समजत आहे. शिवाय होणाऱ्या टिकेला कसं सामोर जायचं, त्याला कसं उत्तर द्यायचं याचीही रणनिती याच बैठकीत आखली जाणार असल्याचं सुत्रांकडून समजतय.