जाहिरात

भाजपच्याच नेत्याने विनोद तावडेंना अडकवलं? हितेंद्र ठाकूरांच्या दाव्याने खळबळ

विरारमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भाजपच्याच नेत्याने विनोद तावडेंना अडकवलं? हितेंद्र ठाकूरांच्या दाव्याने खळबळ
विरार:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी विरारमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विरारमधील विवांता नावाच्या हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यावेळी विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा बाचाबाची झाली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

VIDEO : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा

नक्की वाचा - VIDEO : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात बविआचे ज्येष्ठ नेते हितेंद्र ठाकूर आणि विरार मतदारसंघाचे आमदार यांनी मोठा दावा केला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा फोन आला होता. त्यांनी या सर्व प्रकाराचं कौतुक केलं. तुम्ही योग्य करीत आहात, त्यांना धडा शिकवा अशी विनंती केली असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी NDTV मराठीशी बोलताना केला आहे. 

राजकीय नेत्याने मतदानाच्या 48 तासांपूर्वी मतदारसंघ सोडणं अपेक्षित असतं. मात्र तरीही विनोद तावडे मतदारसंघात काय करीत होते, असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय विनोद तावडे यांनी मला फोन केल्याचे ठाकूर यांनी सांगितलं. माझी चूक झाली, मला सोडवा अशी विनंती विनोद तावडे यांनी केल्याचा दावा स्वत: हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.  याशिवाय भाजपच्या एका नेत्याने विनोद तावडे हे विरारमध्ये पाच कोटी रुपये घेऊन येणार असल्याची टीप दिली होती. त्यानुसार विनोद तावडे यांनी रात्रीतून अनेक कार्यकर्त्यांना पैसे वाटले. त्यानंतर उरलेल्या कार्यकर्त्यांना पैसे वाटण्यासाठी आज विवांतामध्ये बैठक घेण्यात आल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला आहे. यावेळी एक काळ्या रंगाची बॅगही दिसून येत आहे. याशिवाय एक डायरीही दिसून येत आहे. या  घटनेच्या वेळी नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे बविआचे उमेदवार क्षितिज ठाकूरही उपस्थित होते. डॅशिंग नेते म्हणून ओळख असलेले क्षितिज ठाकूर यांच्याकडून पोलीस बॅग खेचून घेण्याचा प्रयत्न करीत होते. समोरच्या खुर्चीवर विनोद तावडे बसले होते. काही वेळाने क्षितिज ठाकूर टेबलावर चढले. यावेळी विनोद तावडे त्यांना खाली बसण्याची विनंती करीत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटपासंदर्भातील हा प्रकार घडल्याने भाजपला मोठा धक्का सहन करावा लागू शकतो. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com