जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक, नाटककार शेक्सपियर यांचं नावं उच्चारलं की लगेच 'नावात काय आहे?' हे त्यांचं वाक्य लगेच सर्वांना आठवतं. निवडणुकीच्या रणधुमाळीत नावला खूप महत्त्व आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार हा त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या नावावर मतं मागत असतात. वडिलांचं नाव घेऊन त्यांची मुलं राजकारणात पदार्पण करतात. प्रत्येक निवडणुकीत ही परंपरा सुरु आहे. त्याला कोणताही पक्ष आता अपवाद राहिलेला नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी प्रमुख उमेदवाराच्या नावाचा अन्य एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातही यंदा तोच प्रकार घडलाय. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (29 ऑक्टोबर) रोजी संपली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे महेश शिंदे यांच्यात मुख्य लढत आहे. पण, दोन्ही प्रमुख उमेदवारांचे नामसाधर्म्य असणाऱ्या तीन उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांची आमदार महेश संभाजी शिंदे यांच्याशी थेट लढत झाली होती. त्यावेळेस शशिकांत जगन्नाथ शिंदे यांच्यासह महेश गुलाब शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
यावेळी सोमवारी शशिकांत धर्माजी शिंदे या (रा. लिंब, ता. सातारा) अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. मंगळवारी शिवसेनेचे उमेदवार महेश संभाजी शिंदे या (कोपरखैराणे- नवी मुंबई) यांच्यासह महेश सखाराम शिंदे (रा. कोंढवली), महेश किसन शिंदे (रा. आसनगाव) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसऱ्या बाजूने मुख्य उमेदवार शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्याविरुद्ध शशिकांत जगन्नाथ शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
( नक्की वाचा : शशिकांत शिंदेंच्या कारचे स्टेअरिंग नरेंद्र पाटलांच्या हाती; सातारा जिल्ह्यात महायुती बॅकफुटवर )
हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास मतदारांसमोर संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारांना चकवा देण्यासाठी आणि उमेदवारांची मते विभागली जाण्यासाठी ही राजकीय खेळी आहे, अशी चर्चा आता सुरु झालीय. या खेळीचा फायदा कुणाला मिळतो हे निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world