जाहिरात
Story ProgressBack

26 वर्षांच्या तरुणामुळे भाजपाचं मिशन धोक्यात

Read Time: 3 min
26 वर्षांच्या तरुणामुळे भाजपाचं मिशन धोक्यात
BJP : भाजपाला बालेकिल्ल्यात एका तरुणानं आव्हान दिलं आहे.
मुंबई:

Ravindra Singh Bhati:  आगामी लोकसभा निवडणुकी भारतीय जनता पक्षाला 370 जागा मिळवून देण्याचं लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात भाजपानं आपली शक्ती पणाला लावलीय. पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांसह सर्व भाजपाची संपूर्ण फौज निवडणुकीच्या प्रचारात संपूर्ण शक्तीसह उतरली आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपाची राजस्थानवर मोठी भिस्त आहे.

राजस्थानमध्ये मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आलीय. आता आगामी लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 25 जागा जिंकण्याचं मिशन भाजपानं निश्चित केलंय. भारतीय जनता पक्षाचं हे मिशन रविंद्र सिंह भाटी  26 वर्षांच्या अपक्ष उमेदवारामुळे धोक्यात आलं आहे.

का उडालीय भाजपाची झोप?

राजस्थानमधील बारमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडं आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात भाजपाकडून केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी रिंगणात आहेत. विद्यमान खासदार असलेल्या चौधरी यांचं पारडं जड मानलं जात होतं.  पण, रविंद्र सिंह भाटी या तरुण आमदारानं लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानं या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.  

शिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या भाटी यांनी निवडणूक अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोंची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी पाहून बारमेरची लढाई सोपी नसल्याचं भाजपाच्या लक्षात आलं. 

रविंद्र सिंह भाटी यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असलेला जनसमुदाय (फोटो : NDTV राजस्थान)

रविंद्र सिंह भाटी यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असलेला जनसमुदाय (फोटो : NDTV राजस्थान)

भाजपाची पळापळ

भाजपानं राजस्थानमधील मिशन 25 अडचणीत आल्यानं मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या मतदारसंघावर विशेष फोकस केला आहे. इतकंच नाही तर भाजपाचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा देखील येथील प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत. भाटी यांचं आव्हान परतावून लावण्यासाठी भाजपानं मास्टर प्लॅन तयार केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या मतदारसंघात नियोजित आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी देखील भाजापा उमेदवार कैलाश चौधरी यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात सभा घेऊ शकतात. बारमेर-जैसलमेरमधील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या सभा घेण्याचा भाजपाचा प्लॅन आहे. इतकंच नाही तर अभिनेते सनी देओल आणि कंगना राणावत यांचा रोड शो देखील प्रस्तावित असल्याचं वृत्त NDTV राजस्थाननं दिलं आहे.

अटल बिहारी वाजपेयींच्या 3 वाक्यांनंतर समजला देशाचा कौल, इंदिरा गांधींचा पराभव झाला होता निश्चित
 

57 वर्षांचा रेकॉर्ड मोडणारा तरुण

जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपाची झोप उडवणारे रविंद्र सिंह भाटी कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपल्या देशात महाविद्यालयीन निवडणुकांपासून सक्रीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची मोठी परंपरा आहे. भाटी देखील याच परंपरेतील आहेत. 

भाटी जोधपूरमधील जय नारायण विद्यापीठातील (JNVU) विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 2019 साली त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिकीट मागितलं होतं. पण, त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. जोधपूर विद्यापीठाच्या 57 वर्षांच्या इतिहासात अपक्ष म्हणून विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकणारे ते पहिलेच उमेदवार होते. 

अमित शहांच्या भेटीसाठी दिल्ली का गाठली? राज ठाकरेंनी दिलं उत्तर
 

9 दिवसांमध्ये भाजपा सोडलं

रविंद्र सिंह भाटी यांनी राजस्थानमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.  त्यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी फक्त 9 दिवसांमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देत शिव मतदारसंघातून  अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी सर्व प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवला.

सोशल मीडियावर सक्रीय असलेले भाटी हे तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर बारमेर-जैसलमेर मतदारसंघात भाटी यांच्या राजपूत समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. भाजपाच्या या परंपरागत व्होट बँकेला भाटी यांच्यामुळे तडा जाऊ शकतो. त्यामुळे भाजपा अधिक अडचणीत सापडली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination