महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झाला. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या भूमिकेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हा प्रश्न विचारला जात होता. यावेळी राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट का घेतली? याचं उत्तर दिलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
मी अमित शहांना भेटल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. 2014 आणि 2019 मधील मी घेतलेल्या निवडणुकीची भूमिका नीट समजावून घ्यायला हवी. मोदी पंतप्रधान व्हावे हे मी सर्वात प्रथम मी सांगितलं. ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटल्या नाहीत. मी एखाद्या गोष्टीवर टोकाचे प्रेम करतो. विरोध पण टोकाचा करतो.
मी महाराष्ट्रावर टोकाचे प्रेम करतो. पाच वर्षात ज्या गोष्टी पटल्या त्याचे अभिनंदन केले. ज्या गोष्टी पटत नाही त्याचा टोकाचा विरोध केला. विश्वास टाकला तर मी टोकाचे प्रेम करतो. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोध करतो. स्वर्थासाठी कधीच विरोध केला नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; शिवाजी पार्कातून राज ठाकरेंची मोठी घोषणा
'आज उद्धव ठाकरे , संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे , संजय राऊतांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात. तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले आपण एकत्र आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले एकत्र आले पाहिजे. म्हणून अमित शाहांना फोन करुन म्हटलो एकत्र यायचे म्हणजे काय? यासाठी अमित शाहांना भेटायला दिल्लीला गेलो, असं कारण राज ठाकरे यांनी दिल्लीच्या दौऱ्याचं केलं.
भाजपला पाठींबा देताना राज ठाकरेंनी उद्धव-संजय राऊतांना फटकारलं, म्हणाले...
दिल्लीला जाण्यात वावगं काय?
ठाकरे कधी दिल्लीला गेले नाहीत अशी टीका करणाऱ्यांना राजकीय इतिहासच माहिती नसतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे 1980 साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं... ह्यात वावगं काय ? असा प्रश्न राज यांनी या सभेत विचारला.
चिन्हाच्या बाबतीतही अफवा
'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार... ! कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका, असं आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world