बारामती लोकसभेत सध्या पवार विरूद्ध पवार असा सामना रंगतोय. सुप्रिया सुळेंसाठी संपुर्ण पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे. तर सुनेत्रा पवारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर पार्थ पवारही जोरदार प्रचार करत आहेत. पार्थ पवार यांचे बारामतीत सध्या झंझावाती दौरे सुरू आहेत. अशा वेळी राज्य सरकाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पार्थ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. एकीकडे पुणे आयुक्तालयाने महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत कपात केली आहे तर काहींची काढून घेतली आहे. अशा वेळी पार्थ यांना सुरक्षा देण्यात आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा - 1 लाख शेतकरी घेऊन बच्चू कडू जिल्हाधिकारी कार्यालयात घुसणार? कारण काय?
पार्थ यांना वाय प्लस सुरक्षा
बारामतीच्या मैदानात आईसाठी मुलगा जिवाचे रान करत आहे. पार्थ पवार संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, गावागावात संवाद, चौकसभा, पदयात्रा यांचा त्यांनी धडाका लावला आहे. यावेळी मोठ्या संख्येने ते जनतेच्या गराड्यात असतात. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता चार दिवसा पुर्वी राज्य सरकारने पार्थ पवार यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांना आता वाय प्लस सुरक्षा असेल. वाय प्लस सुरक्षेत 10 सशस्र कमांडो सुरक्षेत तैनात असतात.
अनेकाच्या सुरक्षा काढल्या
दरम्यान निवडणुकीच्या रणधुमाळीत पुणे पोलिस आयुक्तालयाने अनेकांच्या सुरक्षा काढल्या आहेत. तर काहींच्या सुरक्षेत कपात केली आहे, अशी माहितीही समोर आली आहे. अशा वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या लेकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्याही सुरक्षेत वाढ करवा अशी मागणी होत आहे
बारामतीची लढत प्रतिष्ठेची
बारामती लोकसभेत यावेळची लढत ही प्रतिष्ठेची झाली आहे. पवार विरूद्ध पवार असा सामना इथे रंगतोय. अजित पवार आपल्या पत्नीसाठी तर शरद पवार आपल्या लेकीसाठी मैदानात जिवाचे रान करत आहेत. शरद पवारांनी आपल्या राजकीय जिवनात एकदाही पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे विजयाची परंपरा कायम राखण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. तर काकांना धोबीपछाड देण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world