भाजपनेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे यांना त्यांनी गोळ्या घातल्या असत्या असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता रामदास कदम यांचे चिरंजिव आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर त्याच भाषेत टीका केली आहे. मेलेल्या काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी जिवंत करण्याचं पाप केलं आहे. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला. बाळासाहेब आज असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा हात मोडला असता. शिवाय त्यांना घरातूनही हाकलून दिले असते असे वक्तव्य केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांनी लोकसभेमध्ये काँग्रेसच्या पंजावर मतदान केलं. बाळासाहेब जर का आज हयात असते तर उध्दवजींचा हात त्यांनी मोडला असता. शिवाय त्यांना घरातून हाकलून दिलं असतं असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. शिवाय त्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात लढा दिला. त्या काँगेसला जिवंत करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला गद्दार म्हणून नये. शिवाय निष्ठा काय असते हे ही शिकवू नये. शिवसेना म्हणजे हिंदुत्त्वाचा विचार. हा विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहणार हे जनतेने ठरवलं आहे असं ही ते यावेळी म्हणाले.
दापोली विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद होता. स्थानिक पातळीवरचे हे वाद आता मिटले असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. राज्यात पुन्हा युतीचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे आम्ही सर्व वाद विसरून कामाला लागलो असल्याचे कदम म्हणाले. या मतदार संघातून 50 हजाराचे मताधिक्य घेवून विजयी होवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. रामदास कदम यांनी या आधी स्थानिक भाजप नेत्यांवर टीका केली होती. त्यामुळे कदम यांचे काम करणार नाही अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली होती.
ट्रेंडिंग बातमी - 'गावात येऊन रोज तुमचे मुके घ्यायचे काय?' भाजप उमेदवार असं का बोलले?
योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून दापोली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम यांचे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या समोर विजय मिळवण्याचे आव्हान असेल. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दापोली मतदार संघात प्रचार सभा घेणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.