
Actress Priya Marathe Passed Away: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले आहे. प्रिया मराठेला कर्करोगाचे निदान झाले होते. गेल्या वर्षभरापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिची कर्करोगाची झुंज अपयशी ठरली. आज पहाटे साडे चार वाजता मीरा रोड येथे तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी भावनिक पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे.
प्रविण तरडेंची पोस्ट
प्रसिद्ध अभिनेते प्रविण तरडे यांनीही प्रिया मराठेच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "प्रिया कॅन्सरशी शेवट पर्यंत लढली एखाद्या योद्धया सारखी.. पण आज ती लढाई नियतीने थांबवली.. एक हेवा वाटावा असा सुखी संसार तुटला.. शंतनु मित्रा या लढाईत तु तीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास.. या कठीण प्रसंगी आम्ही सारे परिवार म्हणून तुझ्या सोबत आहोत .. देताना मन धजावत नाहीये पण प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली," असं प्रविण तरडे यांनी म्हटले आहे.
Priya Marathe Death: 'माझ्या आरोग्याची समस्या', 'ही' होती प्रिया मराठेची अखेरची 'पोस्ट' अन् 'मालिका
हेमांगी कवी भावुक
"वाटलं होतं बरी होशील प्रिया! दुःख पचवण्याची ताकद मिळो हे कसं बोलायचं शंतनूला, तिच्या घरच्यांना? सहज नसतं ते! कधीच! माझी सख्खी बहीण अशीच ३९व्या वर्षी कॅन्सरमुळे गेली, ते दुःख, तिचं जाणं मी आजतागायत पचवू शकले नाही! प्रिया अत्यंत गोड, अतिशय सुंदर दिसणारी आणि तितकीच लाघवी होती. Screen वर आली की screen भरून जायची, आजूबाजूला काही असलं नसलं काही फरक पडत नसे! Magic! असं फार कमी कलाकारांच्या बाबतीत होतं! माणसात एक उपजत warmth असते म्हणतात नं तशी warmth होती तिच्यात! बहुतेक हेच screen वर उमटत असावं," अशी भावुक पोस्ट करत हेमांगी कवीने हळहळ व्यक्त केली आहे.
गोष्ट अशी संपायला नको होती...
"मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?" हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्यान्ने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या ह्या पोरीला मी मनापासून 'लेक' मानलं होतं. बांदोडकर काॅलेजात एक माॅब प्ले केला होता. अ फेअरी टेल...प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली. माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का... तिच्या आयुष्यातले खूप चढ उतार पाहिले. शंतनुसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू...बाबा लव्ह यू, असे म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world