Actress Aishwarya Narkar Whatsapp Scam: सायबर गुन्हेगार आता नवनवीन शक्कल लढवून सुशिक्षित नागरिकांना आणि कलाकारांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच असाच एक प्रकार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत घडला. "एका स्कॅममधून देवाच्या कृपेने वाचली आहे," असे म्हणत त्यांनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय होता नेमका प्रकार?
ऐश्वर्या नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार व्हॉट्सअॅप मेसेजपासून सुरू झाला. 4-5 दिवसांपूर्वी त्यांना महानगर गॅसच्या लोगो असलेला एक मेसेज आला. "तुमच्या कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे, बिल भरले नसल्याने आज संध्याकाळी गॅस कापला जाईल," अशी भीती त्यांना दाखवण्यात आली.
सॉफ्टवेअर अपडेटचे निमित्त
ऐश्वर्या यांनी आपली सर्व बिले भरलेली असतानाही गॅस कापण्याबाबत जाब विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीने सांगितले की हे बिलासाठी नाही तर 'सॉफ्टवेअर अपग्रेडेशन'साठी आहे. चोराने त्यांना व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करून माहिती भरण्यास सांगितले. ही एक 'APK फाईल' होती, जी सहसा अँड्रॉइड फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाते.
(नक्की वाचा- Rinku Singh's Father: रिंकू सिंहवर दुःखाचा डोंगर! वर्ल्ड कपदरम्यान वडिलांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी)
'आयफोन'मुळे वाचला बचाव!
ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आयफोन (iPhone) असल्याने त्या फाईलवर क्लिकच होत नव्हते. जेव्हा त्यांनी चोराला वेबसाइट विचारली, तेव्हा त्याने त्यांना "दुसऱ्या कोणत्याही अँड्रॉइड फोनवरून ही फाईल ओपन करा," असा आग्रह धरला. याच वेळी ऐश्वर्या यांना शंका आली आणि त्यांनी अधिकृत वेबसाइटवरूनच जे काही करायचे ते करू, असे ठणकावून सांगितले. हे ऐकताच समोरील व्यक्तीने कॉल कट केला.
(नक्की वाचा- BMC Mayor News: मुंबई महापौरांच्या हातात 1 कोटींचं घड्याळ? माध्यमांवर चर्चा; स्वतः रितू तावडेंनी केला खुलासा)
चाहत्यांना महत्त्वाचा सल्ला
या अनुभवानंतर ऐश्वर्या यांनी आपल्या चाहत्यांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कोणताही बँकिंग किंवा गॅस कनेक्शन कापण्याबाबतचा फोन आल्यास लगेच कृती करू नका. व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या अनोळखी APK फाईल्सवर कधीही क्लिक करू नका, यातून तुमचा फोन हॅक होऊ शकतो. जे काही बदल किंवा पेमेंट करायचे असेल, ते त्या संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरूनच करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world