
Anil kapoor: अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर या दोन दिग्गज कलाकारांनी अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, अनिल कपूरला सुपरस्टार बनवणारा चित्रपट पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना ऑफर झाला होता. हे अनेकांना माहीत नसेल. या चित्रपटात अनिल कपूर यांनी असा अभिनय केला की, तो त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला आणि आजही या चित्रपटाला त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटां पैकी एक मानले जाते. अमिताभ यांनी हा चित्रपट सोडणे हे अनिल कपूर यांच्या पथ्थ्यावर पडले असचं म्हणावं लागेल. त्यानंतर त्यांनी कधी ही मागे वळून पाहीले नाही.
हा चित्रपट म्हणजे 'मेरी जंग' (Meri Jung) आहे. या चित्रपटाचे मूळ नाव 'शतरंज' असे ठेवण्यात आले होते. सुरुवातीला या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. तर जया प्रदा मुख्य अभिनेत्री होत्या. अनिल कपूर यांना खलनायक अमरीश पुरी यांच्या मुलाची भूमिका साकारायची होती. मात्र, त्याच वेळी अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली. त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स थांबले. शिवाय, ते राजकारणात पाऊल ठेवण्याची तयारी करत असल्याने त्यांनी हा चित्रपट सोडला. अमिताभ यांनी माघार घेताच जया प्रदा यांनीही प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला.
यानंतर निर्माते एन.एन. सिप्पी यांनी चित्रपट दिग्दर्शनाची जबाबदारी सुभाष घई यांच्याकडे सोपवली. सुभाष घई यांनी पटकथेवर काम केले. चित्रपटाचे नाव बदलून 'मेरी जंग' असं केले. नवीन नायकाच्या शोधाची मोठी समस्या होती. सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी चर्चा झाली. पण गोष्ट जमली नाही. त्याच वेळी, सुभाष घई यांनी 'मशाल' चित्रपटात अनिल कपूर यांचा अभिनय पाहिला होता. त्यामुळे ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी अनिल कपूरला 'मेरी जंग'चा मुख्य हिरो बनवण्याचा निर्णय घेतला.
एका वेळी अनिल कपूर यांनी स्वतः म्हटले होते की, “जर अमिताभ बच्चन यांनी तो चित्रपट सोडला नसता, तर कदाचित मला ही संधी मिळाली नसती.” हे खरे आहे की 'मेरी जंग'ने अनिल कपूरच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. त्यांचे कोर्टरूम सीन (Courtroom Scene), जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी आणि भावनिक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आज हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटानंतर अनिल कपूर यांनी एका मागून एक हिट चित्रपट दिले. ते बॉलिवूडच्या बड्या स्टारमध्ये गणले जावू लागले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world