
TV Actress Stabbed by Husband: बेंगळुरूमध्ये एका टीव्ही अभिनेत्रीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री आणि निवेदिका मंजुळा श्रुती यांना त्यांच्याच पतीने चाकू मारला. पती अमरेश याला पत्नी श्रुतीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे. 'अमृतधारे' सारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रुती यांच्यावर 4 जुलै रोजी हनुमंतनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुनिश्वर लेआउटमध्ये हल्ला करण्यात आला होता. हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्यात खूप तणाव होता.
श्रुती यांनी २० वर्षांपूर्वी अमरेशशी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला दोन मुले असून ते हनुमंतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, अमरेशला श्रुतीचे वागणे पसंत नव्हते आणि त्यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून तणाव होता.

मिरचीचा स्प्रे, नंतर चाकूने अनेक वार
श्रुती तीन महिन्यांपूर्वी अमरेशपासून वेगळ्या होऊन आपल्या भावासोबत राहू लागल्या होत्या. मात्र, यानंतर अनेक अडचणी असूनही गेल्या गुरुवारी त्यांच्यात समेट झाला होता.
(नक्की वाचा: BJP Leader: भाजपा नेत्याचे स्माशानात कारमध्ये सुरु होते प्रेमाचे चाळे, पकडले जाताच झाली गडबड, पाहा Video )
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दुसऱ्याच दिवशी त्यांची मुले कॉलेजला गेल्यानंतर, अमरेशने कथितरित्या श्रुतीवर हल्ला केला. त्याने आधी मिरचीचा स्प्रे वापरला आणि नंतर त्यांच्या बरगड्या, मांडी आणि मानेवर चाकूने अनेक वार केले. तसेच, त्याने त्यांचे डोके भिंतीवर आपटल्याचेही सांगितले जात आहे.

श्रुती यांच्यावर सध्या व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात हनुमंतनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी अमरेशला अटक केली आहे. अभिनेत्री श्रृती आणि त्यांचे पती अमरेश यांच्यातील घरगुती वादावरून हनुमंतनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world