- महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले
- 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बिबट्यांच्या दहशतीवर आणि बचाव उपायांवर भाष्य केले जाणार आहे
- मालिकेच्या कथानकात राया-मंजिरीच्या लग्नात बिबट्याच्या हल्यामुळे गावात दहशत निर्माण होणार आहे
Leopard Terror In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये (Bibtya Terror In Maharashtra News) मोठी वाढ झालीय. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि जनजागृतीचा गंभीर मुद्दा म्हणून हा विषय राज्यभर चर्चेत आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांच्या माध्यमातून विविध सामाजिक मुद्यांना नेहमीच हात घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये देखील बिबट्याची वाढती दहशत, सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम आणि बचावासाठी घ्यायची काळजी यावर भाष्य केलं जाणार आहे.
राया-मंजिरीच्या लग्नात नवं विघ्न | Bibtya Terror In Yed Lagal Premach Serial
सध्या मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची लगबग सुरु आहे. ऐन मेंदीच्या कार्यक्रमात बिबट्याच्या हल्याने गावात दहशत पसरणार आहे. याआधीही राया-मंजिरीच्या आयुष्यात अनेक संकटं आली आहेत. दोघांनीही एकमेकांची साथ देत या संकटांचा धैर्याने सामना केलाय. बिबट्याच्या रुपात आलेल्या या नव्या संकटातून राया-मंजिरी कशी सुटका करून घेणार? हे मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Photo Credit: Star Pravah Channel
मालिकेतही बिबट्याची दहशत
मालिकेतल्या या नव्या वळणाबाबत सांगताना विशाल म्हणाला, 'महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हल्यामध्ये आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ऐकलं तरी अंगावट शहारे येतात. येड लागलं प्रेमाचं मालिकेतही बिबट्याच्या हल्ल्याने दहशत पसरणार आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता काय उपाययोजना केल्या जाव्यात यावर भाष्य केलं जाणार आहे. वनविभागाच्या सूचनांचे पालन करा. बिबट्या दिसल्यास वनविभागाला त्वरित कळवा लगेच जेणेकरून योग्य उपाययोजना करता येतील. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात सतर्क रहा. एकट्याने जाणं टाळा, शक्य झाल्यास गटाने चला. रस्ते, घराचे प्रवेशद्वार आणि बाहेरील भाग पुरेशा प्रकाशात ठेवा. लहान मुलांना एकटे सोडू नका अशा अनेक गोष्टी मालिकेच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रसंग साकारणं मोठी जबाबदारी असल्याची भावना विशालने व्यक्त केली. '

Photo Credit: Star Pravah Channel
"भयाची वास्तविकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न"तर मंजिरी म्हणजेच पूजा बिरारी म्हणाली, ‘बिबट्यांचे हल्ले, त्यामागील कारणं आणि बचावासाठीचे उपाय काय असावेत हा विषय मालिकेतून हाताळणं म्हणजे संवेदनशील पाऊल आहे असं वाटतं. सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावरामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे. भयाची वास्तविकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परिस्थितीचं गांभीर्य राखून आम्ही या विषयावर भाष्य करणार आहोत.
(नक्की वाचा: Pune News: पुणेकरांच्या भीतीत वाढ, आता पुणे एअरपोर्ट परिसरात शिरकाव! कडेकोट सुरक्षेसह स्थानिकांसाठी अलर्ट जारी)

Photo Credit: Star Pravah Channel
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world