
कंगना रनौतने बॉलिवूडमधील अभिनेत्यांबद्दल आपले विचार मांडले आहेत. तिने सांगितले की, बहुतेक पुरुष अभिनेते असभ्य (rude) असतात. चित्रपटाच्या सेटवर तिने त्यांचा त्रास मात्र सहन केला नाही असं तिने सांगितलं. हॉटरफ्लायसोबतच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, जेव्हा तिला विचारले गेले की तिला कधी सह-अभिनेत्यांकडून अनुचित वागणुकीचा सामना करावा लागला आहे का, तेव्हा कंगनाने उत्तर दिले, "मी जास्त हिरोंसोबत काम केले नाही. हिरो खूप 'बदतमीज' असतात." असं ती म्हणाली.
आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना ती म्हणाली, "मी फक्त लैंगिक गैरवर्तनाबद्दल बोलत नाहीय. सेटवर उशिरा येणे, गैरवर्तन करणे, हिरोईनला कमी लेखणे, तिला बाजूला करणे, छोटी व्हॅन देणे, यामुळे मला खूप त्रास झाला. कारण मी या गोष्टींना सहजपणे स्वीकारत नव्हते. तर इतर अनेक अभिनेत्री त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या. त्यामुळे त्यांना वाटले की मला एवढा अहंकार का आहे." असं ही तिने सांगितलं.
कंगनाने अनुराग बसू दिग्दर्शित आणि महेश भट्ट निर्मित 'गँगस्टर' (2006) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने 'वो लम्हे' (2006), 'लाइफ इन अ मेट्रो' (2007) मध्ये काम केले. नंतर मधुर भांडारकर यांच्या 'फॅशन' (2008) या चित्रपटातून तिला चांगलं यश मिळालं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 'क्वीन' (2014) आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' (2015) या चित्रपटांसाठीही तिची खूप प्रशंसा झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world