Arijit Singh News: सिंगिंग रिॲलिटी शो 'फेम गुरुकुल'मधून ओळख निर्माण करणारा गायक काझी तौकीर याने 21 वर्षांनंतर आपला जुना मित्र आणि बॉलिवूडचा सुपरहिट गायक अरिजित सिंग याच्याबाबत मनाला स्पर्श करणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. काझीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अरिजितच्या पश्चिम बंगालमधील जियागंज येथील घरी पोहोचलेला दिसत आहे आणि व्हिडीओमध्ये खास क्षणांची झलकही दाखवलीय. व्हिडीओमध्ये हे दोघे कधी स्कुटीवर फिरताना दिसले, तर कधी क्रिकेट खेळताना. काझीने अरिजितला 'जीनियस', 'प्युअर पॅशन' आणि कोणताही मत्सर किंवा अहंकार नसलेली व्यक्ती असे म्हटले आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यातील जुनी मैत्री आणि जिव्हाळा कायम असल्याचे त्याने सांगितले.
'अरिजितमध्ये ना मत्सर आहे, ना अहंकार'
काझी तौकीरने व्हिडीओमध्ये सांगितले की, वर्ष 2005 मध्ये 'फेम गुरुकुल' दरम्यान त्याची अरिजित सिंगशी भेट झाली होती. त्या वेळी दोघेही किशोरवयीन होते आणि आजही मनातून स्वतःला तसेच समजतात. काझी म्हणाला, "अरिजितसारखी माणसं खूप कमी पाहायला मिळतात. त्याच्यात कोणत्याही प्रकारची असुरक्षितता, मत्सर किंवा कपट नाही. तो पूर्णपणे संगीताप्रति समर्पित असलेला माणूस आहे." काझीने जियागंज आणि मुर्शिदाबादमधील लोकांचेही आभार मानले आणि तिथे खूप प्रेम मिळाल्याचे सांगितले. अरिजितचे कुटुंब आणि स्टाफचे कौतुक करताना त्याने म्हटले की, सर्वजण अतिशय साधे आणि मनाचे चांगले आहेत. व्हिडीओमध्ये दोघांमधील जुनं बाँडिंग स्पष्टपणे दिसतंय, चाहतेही हा व्हिडीओ पाहून खूश झाले आहेत.
(नक्की वाचा : 117 कोटींचे 11 बंगले, 7 महागड्या गाड्या! देशाचे दुसरे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत विजय; पण नंबर 1वर कोण?)
क्रिकेट खेळताना अरिजीत जखमी झाला, तरीही थांबला नाही
काझी तौकीरने व्हिडीओमध्ये एक मजेशीर किस्साही सांगितला. त्याने सांगितले की, अरिजित सिंगने जियागंजमध्ये मुलांसाठी क्रिकेट अकादमी उभारली आहे. तिथे पोहोचल्यावर काझी स्वतः क्रिकेट खेळू लागला. अरिजित बॉलिंग तर काझी बॅटिंग करताना दिसतायेत. याच दरम्यान बॉल लागल्यामुळे अरिजीतला दुखापत झाली. काझी म्हणाला, "सर्वजण घाबरले आणि दादा ठीक आहेत का असे विचारू लागले, पण अरिजित फक्त म्हणाला- 'काही झाले नाही.' दुखापत होऊनही तो सलग तीन-चार ओव्हार बॉलिंग करत राहिला. हाच त्याचा कधीही हार न मानण्याचा स्वभाव आहे.”
(नक्की वाचा : थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशा कृष्णने ऐश्वर्याचा लुक कॉपी केला? 26 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल)
त्याने पुढे सांगितले की, क्रिकेट खेळल्यानंतरही अरिजित रात्री उशीरापर्यंत संगीताचा सराव आणि एडिटिंगच्या कामात व्यस्त होता. काझीने शेवटी त्याला "मनाने आणि विचारांनी खंबीर माणूस" असे म्हणत, दोघे लवकरच काहीतरी नवीन आणि मजेशीर करणार असल्याचे सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world