देशभरात हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे. मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे तर ठिकठिकाणी भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. भक्तगण मनोभावे पूजा-प्रसादाचा लाभ घेताहेत. रामभक्त असलेल्या हनुमानजींचा महिमा अपार आहे, त्यामुळेच त्यांची भूमिका मोठ्या अथवा छोट्या पडद्यावर साकारणे हे एखाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नव्हे. टेलिव्हिजनसंदर्भात चर्चा करायले झाले तर ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांनी साकारलेली हनुमानजींची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' या मालिकेमध्ये दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली. त्यांनी साकारलेल्या भूमिकेस प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आजवर कित्येकांनी रूपेरी पडद्यावर तसेच मालिकांमध्येही हनुमानाची भूमिका निभावली. पण दारा सिंग यांनी साकारलेल्या हनुमानाचे प्रेक्षकांच्या हृदयातील स्थान पक्के आहे. या भूमिकेसाठी त्यांनी अतिशय मेहनत घेतली.
(नक्की वाचा: पद्मभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर मिथुन चक्रवर्ती म्हणाले,'...मला अपेक्षाच नव्हती')
आठ ते नऊ तास राहत होते उपाशी
दारा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "हनुमानाचा मेकअप करण्यासाठी चेहऱ्यावर साचा वापरला जात असे. लुक सेट करण्यासाठी शुटिंगच्या तीन तासांपूर्वी मेकअप करण्यास सुरुवात करावी लागायची. यामुळे आठ ते नऊ तासांपर्यत काहीही खाणे शक्य नव्हते".
पण याबाबत त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या या कठोर तपस्येमुळे कदाचित हनुमानजी खूश झाले की त्यांनीच दारा सिंग यांच्या पात्रामध्ये जीवंतपणा आणला.
दारा सिंग यांना साकारायची नव्हती हनुमानाची भूमिका
दारा सिंग यांचा मुलगा विंदु दारा सिंगने आर.जे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "रामानंद सागर यांनी माझ्या वडिलांना मालिकेमध्ये घेण्याचे निश्चित केले होते. तेव्हा वडिलांनी मला सांगितले होते की मी ही भूमिका साकारणार नाही. या वयात मी ही भूमिका साकारली तर लोक माझ्यावर हसतील".
(नक्की वाचा: अब मेरा समय आया है!... Kalki 2898 ADच्या टीझरसह अमिताभ बच्चन यांचा लुक चर्चेत)
पण हनुमानाच्या पात्रासाठी रामानंद सागर यांनी दारा सिंग यांची निवड पक्की केली होती. स्वप्नामध्ये दारा सिंग यांना हनुमानाच्या भूमिकेत पाहिले, असेही रामानंद यांनी सांगितले होते. यामुळे दारा सिंग त्यांना नकार देऊ शकले नाहीत.
शेपटीमुळे बसण्यासाठी करावी लागत होती खास व्यवस्था
रामानंद सागर यांच्या मुलाने एका मुलाखतीत सांगितले होते की, हनुमानजींचा मेकअप करण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता. कारण त्यांचा संपूर्ण लुक मॅच करणं गरजेचं होते. शेपूट लावल्यानंतर दारा सिंग यांना बसणं कठीण होत असे. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकरिता विशिष्ट डिझाइनच्या स्टुलची व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून त्यांना शेपटीसह बसणे सोपे जाईल.
(नक्की वाचा: 18 वर्षांपूर्वी आमीर खानच्या मुलाची साकारली भूमिका, आता इतका हँडसम दिसतोय हा मुलगा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world