कंदहार विमान अपहरणप्रकरणावर तयार करण्यात आलेल्या IC 814 कंदहार हायजॅक (Netflix series IC 814: The Kandahar Hijack) या मालिकेवरून वादंग निर्माण झालं आहे. हा वाद इतका वाढला आहे की केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आहे. या मालिकेमध्ये दहशतवाद्यांनी विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना मानवता बाळगत चांगली वागणूक दिल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय या दहशतवाद्यांची कोड नेम किंवा टोपणनावे हे हिंदू दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता. या वादानंतर मंगळवारी एक बैठक पार पडली. नेटफ्लिक्सच्या भारतातील उपाध्यक्षा मोनिका शेरगिल आणि केंद्रीय माहिती तथा प्रसारण सचिव संजय जाजू यांच्यात ही बैठक पार पडली होती. 40 मिनिटं चाललेल्या या बैठकीत शेरगिल यांच्यासमोर जाजू यांनी या मालिकेवरून उठलेल्या वादंगाबाबतची परिस्थिती सादर मांजली आणि नाराजीही व्यक्त केली. नेटफ्लिक्सने असे संवेदनशील विषय हाताळत असताना फार काळजी घेणे गरजेचे असते कारण अशा विषयांमध्ये देशातील असंख्य लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात असे जाजू यांनी शेरगिल यांच्यासमोर नाराजी व्यक्त करताना म्हटले.
हे ही वाचा : 'IC 814'मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं का दिली?
नेटफ्लिक्सला कडक शब्दात समज
केंद्र सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे केंद्रातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. या मालिकेमध्ये दहशतवादी संघटना हरकत उल मुजाहिदीनने 1999 साली केलेले विमान अपहरण दाखवण्यात आले आहे. इंडिअन एअरलाईन्सच्या विमानाचे या दहशतवादी संघटनेने अपहरण केले होते. इब्राहीम अथार, शाहीद अख्तर सय्यद, सन्नी, अहमद काझी, जहूर मिस्त्री आणि शाकीर या दहशतवाद्यांनी हे अपरहण केले होते. या दहशतवाद्यांची नावे या मालिकेमध्ये भोला, शंकर, डॉक्टर, बर्गर आणि चीफ अशी दाखवण्यात आली आहे. यामुळे या मालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या परदेशी संस्थेला भारतीय नागरिकांच्या सांस्कृतिक मूल्ये आणि भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी नेटफ्लिक्सला विचारला आहे.
हे ही वाचा: प्रवाशांसोबत अंताक्षरी ते दहशतवाद्याकडून माफी, अनुभव सिन्हाच्या वेब सीरिजमध्ये काय आहे?
मालिकेच्या डिस्क्लेमरमध्ये बदल करण्याचा निर्णय
केंद्र सरकारने दिलेल्या तडाख्यानंतर नेटफ्लिक्स ताळ्यावर आली असून त्यांनी मालिकेच्या सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या सूचनेमध्ये दहशतवाद्यांची खरी नावे आणि काल्पनिक नावे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भारतातील नागरिकांच्या भावना लक्षात घेत या मालिकेतील सगळी सामुग्री पुन्हा तपासली जाईल असे आश्वासन नेटफ्लिक्सकडून देण्यात आले आहे. ही मालिका अपहरणाच्या घटनेवर आधारीत पुस्तके, सरकारकडून उपलब्ध झालेली माहिती आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world