Samantha Raj Marriage : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि चित्रपट निर्माता राज निदिमोरू यांनी 1 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. हे दोघे रिलेशनशिपमध्ये आल्यापासून इंटरनेटवर राज यांची पहिली पत्नी श्यामली डे यांच्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. राज आणि श्यामली यांचा घटस्फोट झालेला नाही, असे काही युजर्स म्हणत आहेत.
काही युजर्स श्यामलीला पाठिंबा देत समांथाला ट्रोल करत आहेत. समांथाने राज आणि श्यामली यांचा संसार तोडला असून ती 'होम ब्रेकर' असल्याचा त्यांचा आरोप आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक श्यामलीबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत.
या संपूर्ण वादावर आता श्यामलीने प्रथमच मौन सोडले आहे. श्यामलीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. श्यामलीने यावेळी तिच्या सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार मानले आहेत.
( नक्की वाचा : Samantha Raj Marriage : समांथा-राजच्या लग्नानंतरचा पहिला निर्णय, फक्त एका दिवसाचा हनिमून! काय आहे कारण? )
या पोस्टमध्ये तिनं लिहिलं आहे की, "मी रात्रभर झोपू शकले नाही. फक्त कुस बदलत राहिले. मी वाद घालत होते. माझ्यासोबत जे काही चांगले होत आहे, ते स्वीकारले नाही तर मी कृतघ्न ठरेन, असा विचार मी करत होते. जे माझ्याकडे येत आहे, त्याचा स्वीकार न करणे अयोग्य ठरेल."
"मी अनेक वर्षांपासून मेडिटेशन (ध्यानधारणा) करत आहे. मेडिटेशन म्हणजे धरती माता, सर्व लोक आणि जीवांना शांती, प्रेम, क्षमा, आशा, प्रकाश, आनंद, सलोखा आणि चांगल्या कर्मांची इच्छा यासाठी आशीर्वाद देणे. माझ्या एका मित्राने मला आठवण करून दिली की, मला आता जे काही मिळत आहे, ती फक्त एका ऊर्जेची परतफेड आहे."
"माझ्याकडे कोणतीही टीम, कोणतेही पीआर, स्टाफ किंवा सहयोगी नाहीत जे माझे पेज सांभाळतील. मी वैयक्तिकरित्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत आहे, तर दुसरीकडे मी अशा एका परिस्थितीला तोंड देत आहे जिथे माझ्या पूर्ण उपस्थितीची गरज आहे. 9 नोव्हेंबरला माझ्या ज्योतिष गुरूंना स्टेज 4 चा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे."
( नक्की वाचा : Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं लग्न केलं ते Raj Nidimoru कोण आहेत? 7 वर्षांत मोडला होता पहिला संसार )
'माझे लक्ष कुठे आहे...'
श्यामलीनं पुढं म्हंटलं आहे की, "हा कॅन्सर त्यांच्या मेंदूपासून शरीराच्या अनेक भागांमध्ये पसरला आहे. मला खात्री आहे की, सध्या माझे लक्ष कुठे असायला हवे, हे तुमच्या सगळ्यांना समजत असेल. त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की, कृपया ही जागा (सोशल मीडिया स्पेस) स्वच्छ ठेवा. धन्यवाद. आशा करते की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला चांगले आरोग्य, आनंद, समृद्धी आणि अध्यात्मिक प्रगती मिळेल."
दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "कुणी ड्रामा आणि ब्रेकिंग न्यूजच्या शोधात असेल, तर तुम्हाला हे सर्व इथे मिळणार नाही. माझी विनंती आहे की, मला बख्श द्या. मला कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी, मीडिया कव्हरेज, एक्सक्लुझिव्ह मुलाखती, ब्रँड प्रमोशन, पेड पार्टनरशिप किंवा सहानुभूती नको आहे. मला इथे कोणालाही काहीही सांगायचे नाही.''
कोण आहेत श्यामली डे?
श्यामली या देखील चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या आहेत. तिने राकेश ओमप्रकाश मेहरा आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यांनी 'रंग दे बसंती' आणि 'ओमकारा' यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये योगदान दिले आहे. श्यामली आणि राज यांनी 2015 मध्ये लग्न केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. राज आणि श्यामली यांनी त्यांच्या लग्न आणि घटस्फोटाबद्दल माध्यमांमध्ये कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. विशेष म्हणजे, श्यामली यांच्या इन्स्टाग्रामवर आजही राजसोबतचे तिचे जुने फोटो दिसतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world