
देशात महिना बदलताच दैनंदिन जीवनातील अनेक नियमांमध्ये मोठे बदल होतात. आता सप्टेंबर महिना सुरू होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाशी आणि कामाशी संबंधित काही नियम बदलत आहेत. या सर्व बदलांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही किंवा तुमच्या नियोजनात अडथळा येणार नाही.
1 सप्टेंबरपासून तुमच्या खिशावर परिणाम करणारे नवीन बदल काय आहेत
जीएसटीमध्ये बदल
पंतप्रधान मोदींनी लवकरच जीएसटीमध्ये नवीन सुधारणा जाहीर केल्या आहेत. तसेच, सरकार आता फक्त 5% आणि 12% असे दोन स्लॅब ठेवणार आहे. दरम्यान 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होत आहे. या बैठकीत जीएसटी स्लॅबबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
युपीएफची अंतिम मुदत सप्टेंबरमध्ये संपणार
केंद्र सरकारी कर्मचारी जे नॅशनल पेन्शन स्कीमच्या (NPS) अंतर्गत येतात, त्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने ही मुदत 30 जून दिली होती. जी वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली. युनिफाइड पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारची एक नवीन पेन्शन योजना आहे.
भारतीय टपाल सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन
जर तुम्ही 1 सप्टेंबरपासून देशात टपालाद्वारे काही पाठवणार असाल, तर ती वस्तू फक्त स्पीड पोस्टनेच जाईल. कारण भारतीय टपाल सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन होत आहे. याचा अर्थ, तुम्ही पाठवलेली पोस्ट स्पीड पोस्टद्वारे पूर्ण केली जाईल.
चांदीच्या खरेदीसाठी लागू होणार हा नियम
1 सप्टेंबरपासून चांदीवर हॉलमार्किंग लागू होऊ शकते. याचा अर्थ, ग्राहक चांदीची शुद्धता आणि गुणवत्ता सहज ओळखू शकतील. यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक आणि दागिन्यांच्या खरेदीमध्ये अधिक पारदर्शकता येईल. हे बदल चांदीच्या बाजाराला अधिक विश्वासार्ह बनवतील आणि किमतींवरही परिणाम होऊ शकतो.
आयटीआर भरण्याची अंतिम तारीख
आयटीआर (ITR) भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे, जर तुम्ही अजूनही रिटर्न फाइल केले नसेल, तर ते लगेच करा, अन्यथा तुम्हाला नंतर दंड भरावा लागेल. कर विभागाने यापूर्वीच 31 जुलैची मुदत वाढवली होती.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल
गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी झाली होती. त्यामुळे, आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
एसबीआय क्रेडिट कार्डचे नियम बदलले
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना धक्का दिला आहे. लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्डवरील रिवॉर्ड सिस्टीम आता बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कार्डने पेमेंट केल्यास शुल्क वाढवण्याची तयारी सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world