मंगेश जोशी, प्रतिनिधी
Gold and Silver Price Prediction 2026: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी दरवाढ होण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या केवळ एका आठवड्यात सोन्याच्या भावात 5000 रुपयांची, तर चांदीच्या भावात तब्बल 26000 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे लवकरच सोने दीड लाखांचा, तर चांदी अडीच लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोन्या आणि चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक
जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या किमतीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सध्या सोन्याचे भाव जीएसटीशिवाय 138200 रुपयांवर पोहोचले आहेत, तर जीएसटीसह हे दर 142140 रुपयांवर गेले आहेत.
चांदीच्या बाबतीतही अशीच स्थिती असून जीएसटीशिवाय चांदीचे दर 232000 रुपये आणि जीएसटीसह 238000 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. 2025 या संपूर्ण वर्षात सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ पाहायला मिळाली असून, गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने या मौल्यवान धातूंनी किमतीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
(नक्की वाचा : Ola-Uber बुक करतानाच महिलांना निवडता येणार फिमेल ड्रायव्हर! टिप देण्याच्या नियमांतही बदल, वाचा A - Z माहिती )
दरवाढीचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धसदृश वातावरण, राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता ही या दरवाढीमागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर किंवा शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्या-चांदीकडे वळतात.
याव्यतिरिक्त अमेरिकन डॉलरमध्ये होणारे चढ-उतार आणि अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जाणारी सोने खरेदी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारत आहेत. जोपर्यंत जागतिक परिस्थिती स्थिर होत नाही, तोपर्यंत ही दरवाढ अशीच सुरू राहण्याची चिन्हे आहेत.
( नक्की वाचा : New Labour Code 2025: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल )
दीड लाखांचा टप्पा ओलांडणार
सराफा व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, जर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती अशीच राहिली तर सोन्याचे दर लवकरच 150000 रुपयांच्या पुढे जातील. तसेच चांदीचे दरही 250000 रुपयांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. नववर्षाच्या स्वागतालाच मौल्यवान धातूंचे हे वाढलेले भाव सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ पोहोचवणार आहेत. तरीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला असलेली मागणी कायम असल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world