
आजची पहाट उजाडली ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका ट्विटनं...ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं... The golden rule of negotiating and success - he who has the gold makes the rules...अर्थात....वाटाघाटी करण्याचा आणि यशाचा एक सोनेरी मंत्र म्हणजे... ज्याच्याजवळ सर्वाधिक सोनं तोच राजा जगाचे नियम ठरवेल.
सध्या जे जागतिक व्यापार युद्ध भडकलंय त्या युद्धातली ट्रम्प यांची ही नवी चाल मानली जातीय. ट्रम्प यांच्या ट्विटनंतर काही तासांमध्येच भारतात सोन्याच्या दरानं लाखाचा टप्पा ओलांडला. आज सोन्याचा भाव प्रतितोळा 1 लाख 1 हजार 455 रुपये होता. जीएसटी धरुन सोन्याची किंमत 1 लाखांच्या पलिकडे गेली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोन्याची किंमत कशी ठरते?
जगातलं प्रमुख समजलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवतं.मोठमोठे खाणमालक, मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत. भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये सोनं आयात केलं जातं. भारत दरवर्षी साधारणपणे 800 टन सोनं आयात करतो. भारतातली सोन्याची किंमत आयातीसाठी लागणाऱ्या पैशांवर ठरते. त्यानंतर आयातीवरचे कर अर्थात कस्टम ड्युटी आकारली जाते
सोन्याचे दागिने घेताना त्यावर किती काम केलंय त्यानुसार मेकिंग चार्जेस म्हणजे घडणावळीचे पैसे लागतात. त्यानंतर सोन्यावर किंवा सोन्याच्या दागिन्यांवर जीएसटी आकारला जातो....त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत सोनं आणखी महाग होतं.
वास्तविक 2023 मधील ऑक्टोबर महिन्यापासूनच सोन्याचे दर वाढतील, अशी चिन्हं दिसत होती. कारण रशिया-युक्रेन युद्ध तसंच आखाती देशांमधील युद्ध सुरु झाले होते. युद्धाचे ढग गोळा झाले की सोन्याचे दर हमखास वाढतात. मात्र जानेवारीमध्ये अमेरिकेत ट्रम्प सरकार सत्तेवर आलं आणि त्यानंतर सोन्याच्या दरांनी एकदम फास्ट ट्रेनच पकडली.
( नक्की वाचा : Gold Price : लग्नसराईत होणार खिसा रिकामा! वाचा काय आहे कारण? )
कसा वाढला सोन्याचा भाव?
- 50 हजार प्रति तोळा असलेलं सोनं 75 हजारांवर जायला 48 महिने म्हणजे २ वर्षं लागली
- 75 हजार तोळा असलेलं सोनं अवघ्या 9 महिन्यांमध्ये 90 हजारांवर गेलं
- तर 90 हजार तोळा असलेलं सोनं 1 लाखांवर जायला फक्त 10 दिवस लागले.
सोन्याचे दर वेगानं का वाढले?
ही आकडेवारी पाहून एक प्रश्न पडतो ? गेल्या दहा दिवसांत सोन्याचे दर एवढ्या पटापट का वाढले ? याचं उत्तर म्हणजे जगात काय घडामोडी सुरू आहेत, त्याचा मोठा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. जगातल्या विविध देशांवर युद्धाचे ढग दिसतायत. अमेरिकेत सत्ता येताच ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ अर्थात आयात कराची घोषणा केली आणि व्यापार युद्धाला सुरुवात झाली...
अमेरिकेला चीन नडला आणि चीननंही अमेरिकेवर टॅरिफ लावण्याची खेळी खेळली. अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये व्यापार युद्ध भडकलं आणि त्यामध्ये अख्खं जग वेठीला धरलं गेलं.
जागतिक अनिश्चिततेचा काय होतो परिणाम?
ज्या वेळी जगामध्ये आर्थिक अनिश्चितता निर्माण होते, त्यावेळी जगातले शेअर बाजार अस्थिर होतात. याच अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित वाटते. जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी चिन्हं दिसू लागताच सोन्याच्या किमती वाढतात. कारण सोन्याला 'सेफ हेवन अॅसेट' अर्थात गुंतवणुकीचा एक अतिशय सुरक्षित पर्याय मानला जातो. गुंतवणुकीचे इतर पर्याय डळमळीत झाले, तरी सोन्याचं मूल्य आणि महत्त्व कमी होत नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदार सोन्यामधल्या गुंतवणुकीला 'हेजिंग स्ट्रॅटेजी' म्हणून पाहतात
हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणजे एका गुंतवणुकीतून झालेला तोटा भरून काढण्यासाठी दुसऱ्या पर्यायात म्हणजेच सोन्यामध्ये गुंतवणूक करणं...म्हणजेच जेव्हा जेव्हा शेअर बाजारात तोट्याची भीती वाटत असेल तर सोन्यात गुंतवणूक केली जाते.
सोन्यातल्या गुंतवणुकीचा खरंच फायदा होतो का, तर या प्रश्नाचं उत्तर अर्थातच हो असं आहे. आणि आकडेवारीनंही ते सिद्ध केलंय... सोन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांना योग्य रिटर्न्स अर्थात परतावा मिळाला.
कोणत्या देशाकडं किती सोनं?
सध्याच्या घडीला कुणाकडे किती सोनं आहे, तेही पाहुया, म्हणजे त्या देशाच्या आर्थिक ताकदीचाही अंदाज येईल.अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडे आजच्या घडीला 8 हजार मेट्रिक टन सोनं आहे.
जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांच्याकडे 3 हजार मेट्रिक टन सोनं आहे.इटली, फ्रान्स, रशिया हे देश साधारणपणे 2 हजार मेट्रिक टनच्या आसपास सोनं बाळगून आहेत. अमेरिकेला नडणाऱ्या चीनकडे 2279 मेट्रिक टन सोनं आहे. तर भारताकडे 876 मेट्रिक टन सोनं आहे.
तर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांकडे 27 किलो सोनं होतं. भारत आणि इतर देश यांचा सोन्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे इतर देशांमध्ये सोनं हा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिला जातो. तर भारतामध्ये सोनं हे परंपरा, प्रतिष्ठा, समृद्धीचं प्रतीक आहे. लग्नामध्ये लेकीला आणि सुनेला सोन्याचे दागिने करण्याची भारतात प्रथा आहे. त्यामुळे भारतातल्या अनेक घरांमध्ये सोन्याचे दागिने किती असतील, याची मोजदाद फारच कठीण आहे.
भारतामधल्या घरांमध्ये एकूण 24 हजार टन सोनं असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी 21 हजार टन सोनं फक्त भारतीय महिलांकडे आहे जगभरातल्या महिलांकडे असलेल्या सोन्यापैकी 11% सोनं ही भारतीय महिलांच्या मालकीचं असल्याचं सांगितलं जातं. केरळ, तामिळनाडूतल्या महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. तर भारतातल्या मंदिरांमध्येही हजारो टन सोनं आहे
सोन्याचे दर कमी होणार का?
गेल्या काही काळापासून बाजारात एक अफवा आहे. ती म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे दर कमी होणार…असं खरंच होऊ शकतं का.....
30 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे....या अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं जाताजाता सोन्याबद्दलचे दोन गोल्डन रुल्स लक्षात ठेवा... एक म्हणजे सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे... आणि दुसरं म्हणजे सोन्याच्या किमती कधीही कमी होत नसतात. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करत राहा, म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्याही संपन्न व्हाल. आणि एवढं सोनं घरी आल्यावर तुमची समृद्धी, प्रतिष्ठाही वाढेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world