
शरद सातपुते, सांगली
Sangli News: सांगलीमध्ये एका कुटुंबाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या स्वीय सहायकासह काही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार याचा मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीमध्ये आढळून आला होता, आणि त्याचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप वडार कुटुंबीयांनी केला आहे.
(नक्की वाचा- व्यथा मांडत असताना अधिकाऱ्यांनी झापलं; शेतकऱ्याची अधिकाऱ्यांसमोर विहिरीत उडी घेत आत्महत्या)
मृत अवधूतच्या कुटुंबाचा आरोप आहे की, बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, त्यांचे स्वीय सहायक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून अवधूतचा मानसिक छळ केला जात होता. याच मानसिक छळामुळे हा घातपाताचा प्रकार घडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीझ बेंन्ज'ने समृद्धी महामार्ग का घेतला दत्तक? वाचा सविस्तर)
पोलिसांकडून तपास सुरू
मृत अभियंत्याची बहीण, रवीना वडार आणि वडार समाजाचे सांगली जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटगी यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ‘जर संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर आम्ही पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्महत्या करू.' या गंभीर आरोपानंतर शहर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world