आजही भारतातील बहुतांश कुटुंबांमध्ये गुंतवणुकीबद्दल बोलताना 'शेअर बाजारापासून दूर राहा' किंवा 'तुमचे पैसे मुदती ठेवीमध्ये सुरक्षित राहतात' हाच सल्ले पिढ्यानपिढ्या दिला जातो. एक काळ होता जेव्हा हा सल्ला अंगीकारणं हे सर्वार्थाने सुरक्षित मानलं जात होतं. मात्र आता काळ बदलला असून गुंतवणुकीचे सोपे, चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. खासकरून शेअर बाजारातील गुंतवणूक ही अधिक सोपी, परवडणारी आणि चांगला परतावा देणारी ठरते आहे. यामध्येही SIP द्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी उत्तम पर्याय बनला आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दलची धास्ती अनाठायी
भारतातील बहुसंख्य नागरीक हे शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून लांब राहाणे पसंत करतात. हा जुगार आहे, शेअर बाजारातील गुंतवणूक ही बेभरवशी असून पैसा बुडतो असा अनेकांचा समज आहे. हा समज बहुतांशी खोटा आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील जवळपास 54 टक्के व्यक्ती मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी (PF) आणि छोट्या बचत स्कीममध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. याउलट, इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण केवळ 17.4 टक्के इतकेच आहे. एका दशकापूर्वी हे प्रमाण 8.6 टक्के होते. आज आकडेवारी सुधारली असली तरी, हा बदल खूप हळू होतोय.
गुंतवणुकीतून तुमचा पैसा वाढतोय का ?
आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभेंदु हरिचंदन यांनी म्हटले की, एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास 6 टक्के परतावा मिळतो, मात्र महागाई दर हा 7 टक्के असल्यास तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा जवळपास शून्य टक्के असतो. वेल्थ जनरेशन करायचे असल्यास म्हणजे तुमच्याकडे असलेला पैसा वाढवायचा असेल तर थोडी जोखीम उचलणे गरजेचे असते. हरिचंदन यांनी म्हटले की, गुंतवणूकदारांनी इक्विटीचा खरा अर्थ प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. इक्विटी म्हणजे बँकेप्रमाणे कर्ज देणे नाही, तर एखाद्या कंपनीमध्ये लहान मालकी हक्क खरेदी करणे असते. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा तुमच्या मित्राच्या कॅफेमध्ये गुंतवणूक करता आणि सह-मालक बनता. जेव्हा कॅफे चांगला चालायला लागतो तेव्हा मिळणाऱ्या नफ्यात तुम्हीही भागीदार असता. म्हणजेच तुम्हाला फायदा होतो. इक्विटी देखील अशाच प्रकारे काम करते. व्यवसाय जसजसा अर्थव्यवस्थेशी संलग्न राहून वाढत जातो, तसतसे कंपन्यांचे उत्पन्न वाढत जाते आणि तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा देखील वाढतो.
दीर्घकाळासाठीची गुंतवणूक जोखीम कमी करते
शेअर बाजार म्हटलं की त्यातील पडझडीच्या बातम्या डोळ्यासमोर होतात, 'लाखो, कोट्यवधींचा चुराडा' अशा हेडलाईन असलेल्या बातम्या आठवू लागतात. सुभेंदु हरिचंदन यांनी म्हटले की, इक्विटीमधील अल्पकाळासाठीची गुंतवणूक ही जोखमीची असते. काळ जितका वाढत जातो तितकी जोखीम कमी होत जाते. एसआयपीद्वारे दीर्घकाळासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक करत राहिल्यास गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळण्याची शक्यता ही खूप जास्त असते. हा परतावा किमान 13 ते 14 टक्के असतो. योग्य गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक केल्यास हा परतावा आणखी जास्त मिळण्याची शक्यता असते. या उलट जर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास केवळ 6 ते 7 टक्के परतावा मिळतो.
FD विरूद्ध SIP ची शर्य कोण जिंकेल ?
सुभेंदु हरिचंदन यांनी एक उदाहरण देत सांगितले की, समजा मुदत ठेवीमध्ये 6 टक्के व्याजदराने 10 लाख रुपये गुंतवले, तर 10 वर्षांमध्ये जवळपास 18 लाख रुपये जमा होतील. महागाई 6 टक्के असेल तर त्या तुलनेत मिळणारा नफा हा काहीच नाही. हीच रक्कम शिस्तबद्ध पद्धतीने इक्विटीमध्ये गुंतवल्यास आणि दीर्घकाळासाठी ही गुंतवणूक जोपासल्यास मिळणारा परतावा 13 टक्क्यांपर्यंत असू शकतो, ज्यातून तुम्हाला अंदाजे 34 लाख रुपयांची रक्कम मिळते. एफडीशी तुलना केल्यास तुम्हाला 16 लाख रुपये जास्त मिळतात. ही रक्कम छोटी नाहीये.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world