
संजीव गोखले, सीए
कर विवरण पत्र अर्थात टॅक्स रिटर्न भरताना एक प्रश्न हल्ली नक्की पडतो तो म्हणजे कोणती कर प्रणाली स्वीकारावी? 2021 नंतर करदात्यांना पर्यायी नवीन कर प्रणाली स्वीकारायची मुभा देण्यात आली. यात कोणतीही वजावट मिळत नव्हती परंतु कराचे दर कमी होते. जुन्या कर प्रणालीत कराचे दर जास्त होते. असे असले तरी कर बचत गुंतवणूक करून कर वाचवणे शकू होत असे. ज्यांना कर बचत गुंतवणूक करणे शक्य नव्हते अश्या करदात्यांना नवीन कर प्रणाली स्वीकारून कमी कर भरता येणे शक्य झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2023 आणि आता फेब्रुवारी 2025 मध्य केवळ नव्या कर प्रणालीत मोठे बदल केले गेले. त्यात कराचे दर कमी करून स्लॅब ही बदलले. एव्हढेच नव्हे तर आधी 7 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही अशी तरतूद करण्यात आली. 2025 मध्ये हीच 7 लाखाची मर्यादा आता वार्षिक 12 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. यामुळे 7 ते 12 लाखांमध्ये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. यामुळे या करदात्यांना जुनी करप्रणाली स्वीकारायची गरजच नाही. जुन्या कर प्रणालीत कोणतेही बदल न केल्याने आता नवीन कर प्रणाली आकर्षक झाली आहे.
असे असले तरी यावर्षी जुलै 2025 मधे जे टॅक्स रिटर्न भरावे लागेल त्याला हा 12 लाखाच्या नियम लागू होणार नाही. हा बदल आर्थिक वर्ष 2025-26 साठी लागू होईल. याच कारणाने अजूनही काही करदात्यांना जुनी कर प्रणाली जास्त फायदेशीर ठरू शकते.
(नक्की वाचा- Mobile App : हे 5 सरकारी अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)
ज्या करदात्याचे उत्पन्न 7 लाखाच्या आत असेल त्याला नवीन कर प्रणाली स्वीकारून आपला कर शून्य करता येईल. मात्र 7 लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्याला स्लॅब प्रमाणे कर भरावा लागेल. अशावेळी साधारण 4 लाखाच्या वर करबचत गुंतवणूक केली असेल तर जुनी कर प्रणाली स्वीकारून कर कमी करता येईल. उदा. 150000 रुपये कलम 80c, 50000 रुपये एनपीएस, 25000 रुपये वैद्यकीय विमा, 2 लाख रुपये गृहकर्ज व्याज अशी गुंतवणूक केल्यास वजावट 4 लाखाच्या वर मिळेल. या करदात्याला जुनी कर प्रणाली स्वीकारून आपला कर कमी करता येईल.
या शिवाय भाड्याच्या घरात राहणाऱ्या करदात्याला घर भाडे भत्ता मिळत असेल तर केवळ जुन्या कर प्रणालीत वजावट मिळते. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या करदात्याला कर्जाच्या व्याजावर संपूर्ण वजावट केवळ जुन्या कर प्रणालीत मिळते. याचा लाभ घेऊन कर बचत करता येईल.
(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)
काही पगारदार करदात्यांना एक शंका असते ती म्हणजे त्यांनी कंपनीत सुरवातीला नवीन कर प्रणाली स्वीकारतो आहे, असे कळवले होते व त्याप्रमाणे त्यांचा कर कापला गेला होता. मात्र आता टॅक्स रिटर्न भरताना जुनी कर प्रणाली स्वीकारली आणि कापलेल्या कराचा रिफंड मागितला तर चालेल का? याचे उत्तर होय असे आहे. कोणताही कर प्रणाली आधी स्वीकारून कर कपात झाली असेल तरी टॅक्स रिटर्न भरताना ती बदलू शकतो. त्यामुळे दोन्ही पैकी जी फायदेशीर तीच टॅक्स रिटर्न भरताना स्वीकारा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world