भारतीय शेअर बाजारासाठी आगामी काळ येणारे वर्ष कसे असेल, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणारा एक अहवाल नुकताच प्रकाशित झालाय. पॅन्टोमॅथ कॅपिटल या ‘प्रायमरी मार्केट' म्हणजेच IPO मार्केटवर घट्ट पकड असणाऱ्या संस्थेने 'प्रायमरी पल्स 2025' हा अहवाल जारी केला असून या अहवालानुसार, 2026 या वर्षात भारताच्या भांडवली बाजारात सुमारे 4 लाख कोटी रुपयांची (INR 4 Trillion) भांडवल निर्मिती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, व्यवहारांच्या संख्येनुसार भारताची IPO बाजारपेठ आता जागतिक स्तरावर 'लीडर' म्हणून उदयास आली आहे.
नक्की वाचा: अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी बारामतीत; AI सेंटर ऑफ एक्सिलन्सचं केलं उद्घाटन
5 वर्षांचा काळ ठरला 'टर्निंग पॉईंट'
गेल्या 10 वर्षांत भारतीय कंपन्यांनी IPO च्या माध्यमातून निधी उभारण्यात तब्बल 12 पटीने प्रगती केली आहे. 2020 ते 2025 हा पाच वर्षाचा काळ भारतीय बाजारपेठेसाठी 'टर्निंग पॉईंट' ठरला आहे. आता भारतीय बाजार केवळ हंगामी तेजीवर अवलंबून न राहता एक मजबूत आणि प्रगल्भ भांडवली बाजार बनला आहे. पॅन्टोमॅथ कॅपिटलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, 2025 मध्ये आलेल्या IPO च्या संख्येनुसार भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर निधी उभारणीत (IPO Proceeds) पहिल्या तीन देशांमध्ये सामील झाला आहे. गुंतवणुकीसाठी आता केवळ मुंबई-गुजरातवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. ओडिशामधील केंद्रपारा, छत्तीसगडमधील भिलाई आणि हरियाणातील हिसार यांसारख्या छोट्या शहरांमधूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असल्याचे दिसून आले आहे.
'मिड-साईज' IPO मध्ये मोठी वाढ
निधी उभारणीचा विचार केल्यास वित्तीय सेवा (Financial Services), उत्पादन (Manufacturing), आयटी (IT) आणि ग्राहक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा निधी उभारणीत मोठा वाटा आहे. विशेषतः 100 कोटी ते 2000 कोटी रुपयांच्या दरम्यान असणाऱ्या 'मिड-साईज' IPO मध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. पॅन्टोमॅथ कॅपिटलचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापक महावीर लुनावत यांनी म्हटले की, "भारताची IPO बाजारपेठ आता सुस्थितीत आली आहे. 2025 मध्ये सेबीने केलेले बदल आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास यामुळे पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये IPO द्वारे होणारी एकूण उलाढाल ही 4 लाख कोटींच्या आसपास असेल असा अंदाज आहे.
नक्की वाचा: सावधान! तुमचंही पॅन कार्ड 31 डिसेंबरला कायमचं बंद होणार आहे का? समस्या टाळण्यासाठी वाचा उपाय
IPO तील गुंतवणुकीची भरपूर संधी
2007 नंतर थेट 2025 साली पहिल्यांदाच 100 पेक्षा जास्त मोठ्या कंपन्यांचे IPO बाजारात आले. म्युच्युअल फंड आणि परदेशी गुंतवणूकदार (FPI) आता अत्यंत चोखंदळपणे गुंतवणूक करत असल्याने बाजारात शिस्त आणि विश्वासार्हता वाढली आहे. थोडक्यात सांगायचे तर, भारतीय कॉर्पोरेट जगतासाठी प्रायमरी मार्केट हे निधी उभारणीसाठीचे महत्त्वाचे साधन बनले आहे. याचा थेट फायदा भारताच्या आर्थिक प्रगतीलाही होताना दिसतो आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world