बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसरीघरारी पोलीस ठाण्याजवळील पटोरी रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिशा हेल्थ केअर सेंटरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसताना कंपाउंडरनेच महिलेवर शस्त्रक्रिया केली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला . शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास तिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतू त्यावेळी कंपाउंडरने रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगितले. वाट पाहत काही वेळाने कंपाउंडरने स्वतः महिलेवर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर लगेचच महिलेचा मृत्यू झाला. मात्र, कंपाउंडरने याची माहिती कुटुंबीयांना दिली नाही.
यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून महिलेला समस्तीपूर मोहनपूर येथील मानव रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी घरातील सदस्यांना संशय आला, त्यामुळे त्यांनी महिलेच्या अंगाला स्पर्श केला असता त्यांना तिचं शरीर थंड असल्याचे दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती तिच्या घरच्यांनी मुसरीघरी पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले. महिलेचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह रुग्णालयासमोर ठेवून राडारोडा करण्यास सुरुवात केली.
लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसरीघरी असलेल्या कोणत्याही रुग्णालयात डॉक्टर नव्हे तर कंपाउंडर उपचार देतात आणि विचार न करता ऑपरेशनही करतात. डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांवर एफआयआर नोंदवून अटक करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत. महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णालय बंद करुन पळ काढली आहे. तसेच रुग्णालयाबाहेरचा बॅनर ही काढून टाकला आहे.
मृत महिलेचे नाव बबिता देवी आहे. ती 28 वर्षाची होती. ती मुसरीघरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर गावातील रहिवासी होती. या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्याचे प्रमुख फैजुल अन्सारी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल.