Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला असावा याचे गूढ आता हळूहळू उलगडू लागले आहे. बारामती येथे झालेल्या या भीषण अपघाताची चौकशी सध्या सुरू असून विमानाचा ब्लॅक बॉक्सही हाती लागला आहे. मात्र, प्रत्यक्ष घटनेच्या वेळी कॉकपिटमध्ये नक्की काय घडले असेल आणि व्हिडिओमध्ये विमान एका बाजूला झुकलेले का दिसत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. अनेक वर्षे व्यावसायिक विमाने उडवण्याचा अनुभव असलेले आणि सध्या खाजगी वैमानिकांना प्रशिक्षण देणारे फ्लाईट कमांडर आलोक सिंह यांनी कॉकपिटमधून या तांत्रिक बाजू सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.
चार्टेड विमानांची गती आणि तांत्रिक रचना
फ्लाईट कमांडर आलोक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार्टेड विमाने किंवा ज्याला आपण लाईट कमर्शियल जेट म्हणतो, त्यांची गती प्रवासी विमानांच्या तुलनेत लँडिंगच्या वेळी जास्त असते. उदाहरण द्यायचे झाले तर, एअरबससारख्या मोठ्या विमानाचा लँडिंगचा वेग साधारणपणे 140 किमी प्रति तास असतो, तर अशा चार्टेड विमानांचा वेग 180 किमी प्रति तास इतका असू शकतो. या विमानांचे इंजिन जुन्या फायटर जेटसारखे असते, जे अतिशय कार्यक्षम मानले जाते, मात्र लँडिंगच्या वेळी त्याचा वेग नियंत्रित करणे मोठे आव्हान असते.
( नक्की वाचा : Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा )
विमान एका बाजूला झुकण्याचे कारण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमान एका बाजूला झुकताना दिसत आहे. यावर बोलताना आलोक सिंह म्हणाले की, जेव्हा पायलट पहिल्या प्रयत्नात लँडिंग करू शकला नाही, तेव्हा त्याने दुसरा प्रयत्न केला असावा. डीजीसीएच्या नियमांनुसार लँडिंगसाठी किमान 3 किमीची दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) आवश्यक असते.
अनेकदा उंचावरून विमानतळ दिसत असला, तरी प्रत्यक्षात लँडिंग करताना धावपट्टी स्पष्ट दिसत नाही. बारामतीसारख्या विमानतळावर आधुनिक नेव्हिगेशन सिस्टम आणि अप्रोच लाईट्स नसल्यामुळे कमी दृश्यमानतेत अपघात होण्याची शक्यता वाढते. कॅप्टन तोमर अवधेश यांच्या मते, बारामती विमानतळाचे नियंत्रण पुणे एटीसीकडे असते आणि तेथे तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी नसल्याने वैमानिकाला स्वतःच्या अंदाजावरच विमान उतरवावे लागते.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजितदादांच्या प्लेन क्रॅशचा आणखी एक Live Video, विमान हवेत डगमगले आणि नंतर झाला आगीचा गोळा )
टेबलटॉप रनवे आणि वैमानिकाचे जजमेंट
बारामतीचा रनवे हा टेबलटॉप स्वरूपाचा आहे, म्हणजेच तो आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंचावर आणि आकाराने लहान असतो. दिल्लीसारख्या मोठ्या विमानतळाचा रनवे 3.9 किमीचा असतो, तर बारामतीचा रनवे केवळ 700 मीटरचा आहे.
व्हायरल व्हिडिओवरून असे वाटते की, दुसऱ्या प्रयत्नात वैमानिकाला अगदी शेवटच्या क्षणी आपण धावपट्टीच्या आधीच उतरत आहोत याची जाणीव झाली असावी. त्या गडबडीत विमान वळवण्याचा प्रयत्न केला असता ते दरीत आदळले असावे. विमानाचे 90 अंशांपर्यंत झुकणे हे अतिशय असामान्य असून शेवटच्या क्षणी रनवे दिसल्याने विमान सावरण्याच्या प्रयत्नात हे घडले असावे, असा अंदाज कॅप्टन तोमर यांनी व्यक्त केला आहे.
व्हीव्हीआयपी दबाव आणि तांत्रिक बिघाड
विमानामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसारखे मोठे नेते असताना वैमानिकावर एक वेगळा मानसिक दबाव असतो, असेही आलोक सिंह यांनी नमूद केले. बारामतीपासून पुणे विमानतळ जवळ होते, मात्र धावपट्टी दिसत असल्याने वैमानिकाने तेथेच उतरण्याचा निर्णय घेतला असावा. पण धुक्यामुळे ऐन वेळी धावपट्टीचा अंदाज चुकला असावा.
या अपघातात तांत्रिक बिघाड होता की वैमानिकाचा अंदाज चुकला, हे आता ब्लॅक बॉक्समधील संभाषणातून स्पष्ट होईल. सध्या एएआयबी या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून लवकरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world