एका तरुणाने घटस्फोट मिळविण्यासाठी थेट देवाला साकडं घातलं आहे. पत्नीसोबतच्या सततच्या वादामुळे त्रस्त झालेल्या या पतीने 'जर मला घटस्फोट मिळाला तर मी दंडवत यात्रा करेन', असा नवस माता बैडवा मंदिरात केला होता. शेवटी घटस्फोट मिळाल्यानंतर आनंदी झाल्याने तरुणाने आपला नवस पूर्ण केला.
नेमकं काय आहे प्रकरण?
या तरुणाचं लग्न होऊन केवळ दोनच वर्ष झाली होती. मात्र या काळात पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता. मानसिक त्रासाला कंटाळून या तरुणाने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अखेर दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने त्याला घटस्फोट मंजूर केला. आपला नवस पूर्ण करण्यासाठी या तरुणाने पहाटे आपल्या गावापासून ते भानपुर येथील मंदिरापर्यंत सुमारे ९ किलोमीटर अंतर दंडवत घातले. विशेष म्हणजे, या यात्रेत त्याचे आई-वडील आणि गावकरी देखील वाजत-गाजत सहभागी झाले होते. सर्वसाधारणपणे लग्नाचं नातं तुटल्यावर लोक दु:खी होतात, मात्र इथं या कुटुंबाने 'सुटकेचा' आनंद उत्सवासारखा साजरा केला. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील सोनहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
दंडवत घालताना तरुणाचे गुडघे सोलवटून निघाले होते. शरीर थकले होते. मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच प्रकारचं समाधान दिसत होतं. संध्याकाळी ६ वाजता मंदिरात पोहोचल्यावर त्यानं देवीचे दर्शन घेतलं आणि प्रसाद चढवला. मी बराच काळ्यापासून मानसिक त्रासात होतो. आता मला खऱ्या अर्थाने शांतता मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया या तरुणाने दिली. ही घटना सध्या सोशल मीडियावर आणि परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. नाती टिकवण्यासाठी लोक देवाकडे प्रार्थना करतात, पण इथे एका व्यक्तीने नाते संपवण्यासाठी देवाला साकडं घातलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world