जाहिरात
Story ProgressBack

भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर

Read Time: 3 min
भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर
मुंबई:

भारतीय जनता पार्टीनं (BJP) अलीकडेच आगामी लोकसभेसाठी 195 (Loksabha 2024) उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्यात उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरातमधल्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. सध्या मोदींच्या (Narendra Modi) मंत्रीमंडळात काम करणाऱ्या मंत्र्यांचाही त्यात समावेश आहे. पण ह्या सगळ्यात एक नाव मात्र गायब आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात भाजपनं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिल्याचं दिसतंय. ते नाव आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं. विशेष म्हणजे गडकरी हे भाजपच्या कोअर टीमचा हिस्सा आहेत एवढच नाही तर मंत्रीमंडळाच्या टॉपच्या पाच मंत्र्यांमध्येही त्यांचा समावेश होतो. असं असतानाही भाजपनं उमेदवारांची जी पहिली यादी जाहिर केलीय त्यात गडकरींचं नाव नाहीय. त्यावरुन आता विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे.

गडकरींच्या नावावर राजकारण का?

2014 ते आतापर्यंत म्हणजे मोदींच्या दोन्ही टर्ममध्ये नितीश गडकरी असे एकमेव मंत्री आहे ज्यांनी स्वत:च्या कामातून स्वतंत्र ठसा उमटलेला आहे. मोदी सरकार मुलभूत सुविधांवर मोठं काम करतंय अशी जी प्रतिमा निर्माण झालेली आहे, त्याच्या पाठीमागे नितीन गडकरींचं रस्ते बांधणीचं काम मोठं आहे. 2019 मध्ये देशात हायवे उभारणीचा प्रतिदिवस वेग हा 36 km एवढा होता. हाच वेग गडकरींनी गेल्या वर्षी 68 कि.मी. प्रती दिन एवढा ठेवला होता. 25  हजार कि.मी. रस्त्यांची उभारणी ही गडकरींचं लक्ष्य होतं. मोदींच्या मंत्रीमंडळात ज्या मंत्र्याचं काम ठळकपणे दिसेल असे कदाचित ते एकमेव नेते आहेत. एवढं काम करत असतानाही मोदी आणि शाह हे गडकरींचं तिकीट कापणार अशी जोरदार चर्चा गेल्या काही काळापासून आहे. त्यातच पहिल्या यादीतून गडकरींचं नाव गायब झाल्यामुळे गडकरींचा पत्ता कट करण्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. 

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत?

ठाकरे गटाचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. धाराशिव आणि औशात त्यांनी सभा घेतल्या. ह्या सभांमध्ये गडकरींच्या मुद्दयावर ठाकरे म्हणाले, ‘भाजपची लिस्ट जाहीर झालेली आहे. त्यात अनेक जणांची नावं आहेत. ज्या कृपाशंकरसिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याचेही नाव लिस्टमध्ये मोदींच्यासोबत आहे. पण ज्या गडकरींनी महाराष्ट्रात भाजपसाठी भूमी निर्माण करण्याचं काम केलं त्याचं मात्र नाव नाहीय. त्यामुळेच गडकरीजी तुम्ही भाजपा सोडा आम्ही तुम्हाला MVA कडून निवडूण आणू. गडकरीजी त्यांना दाखवा की महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या समोर झुकलेला नाही'. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा दिलेला आहे. त्या म्हणाल्या, नितीन गडकरी हे काही फक्त एका पक्षाचे नेते नाहीत तर ते देशाचे नेते आहेत. त्यांनी कधीही सूड भावनेनं राजकारण केलेलं नाही. एखादा खासदार, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या मतदारसंघातल्या रस्त्यासाठी फंड मागायला गेला तर ते कुठलाही भेदभाव न करता, त्याला तो देतात. भाजपसोबत आमचे वैचारीक मतभेद आहेत पण गडकरी साहेबांसाठी आमच्या मनात कायम आदर आहे. कारण संबंधात त्यांनी कधीच कडवटपणा आणला नाही. कधीच बदला घेण्याच्या भावनेनं राजकारण केलं नाही.

फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?

उद्धव ठाकरेंनी गडकरींना तिकीट ऑफर केलं असेल आणि त्यावर भाजपची प्रतिक्रिया येणार नाही असं कसं होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा पक्ष हा फक्त आता बँड बाजाएवढीच राहिलेली आहे. ते गडकरींसारख्या आमच्या राष्ट्रीय नेत्याला सीट द्यायची घोषणा करतायत. हे म्हणजे गल्लीतल्या नेत्यानं एखाद्याला अमेरीकेचा राष्ट्रपती करतो म्हटल्यासारखं आहे. महाराष्ट्राचं जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही. महायुतीतल्या घटक पक्षांसोबत अजून चर्चा चालू आहे. जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकसभा उमेदवारांची घोषणा होईल तेव्हा त्यात गडकरींचं नाव पहिलं असेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination