Delhi Red Fort Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाची (Delhi Blast Case) गुंतागुंत सोडवण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सज्ज झाली आहे. या हाय प्रोफाइल आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी NIA ने 'स्पेशल 10' अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे आणि या विशेष पथकाचं नेतृत्व मराठी आयपीएस अधिकारी विजय साखरे (Vijay Sakhare) यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे, कारण दहशतवादासारख्या संवेदनशील प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
कोण आहेत आयपीएस विजय साखरे?
आयपीएस विजय साखरे हे 1996 बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. अनेक महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे हाताळला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना NIA मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) पदाची जबाबदारी मिळाली आहे. यापूर्वी 2022 मध्ये ते पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर NIA मध्ये महानिरीक्षक (IG) म्हणूनही कार्यरत होते.
या महत्त्वाच्या कामाशिवाय त्यांनी पोलीस अधिकारी झाल्यानंतरही आपलं शिक्षण थांबवलं नाही. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातून 'पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन' विषयात मास्टर्स पदवी पूर्ण केली आहे. पोलिसांच्या कामाव्यतिरिक्त ते एक उत्तम टेनिसपटू आहेत आणि त्यांना क्रिकेट खेळायलाही खूप आवडतं.
( नक्की वाचा : Dr. Shaheen : 'लिबरल' डॉक्टर ते 'जैश'ची कमांडर... शाहीनने पतीला घटस्फोट का दिला? कारण समजल्यावर बसेल धक्का )
केरळ पोलीस दलातही महत्त्वपूर्ण कामगिरी
NIA मध्ये येण्यापूर्वी विजय साखरे यांनी केरळ पोलीस दलातही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 2022 मध्ये NIA मध्ये येण्यापूर्वी ते केरळ पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर होते. यापूर्वी त्यांनी कोची शहर पोलीस आयुक्त (Kochi City Police Commissioner) आणि गुन्हे शाखा (Crime Branch) अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी रोगाचा प्रसार रोखण्यात प्रभावी भूमिका बजावली होती.
या कठीण आणि हाय-प्रोफाइल केसचा तपास विजय साखरे किती कुशलतेने हाताळतात, याकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
तपास पथकाची रचना आणि जबाबदारी
लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाची (Red Fort Blast Case) गंभीर दखल घेत गृह मंत्रालयाने त्याचा तपास NIA कडे सोपवला आहे. NIA चे ADG विजय साखरे यांच्या नेतृत्वाखालील या 'स्पेशल 10' टीममध्ये एक IG, दोन DIG, तीन SP आणि उर्वरित DSP स्तराचे अधिकारी आहेत.
NIA चे महासंचालक (NIA DG) आणि IB प्रमुखांची बुधवारी या प्रकरणी बैठक झाली आहे. या स्फोटाचा तपास करताना NIA ची टीम दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांकडून 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी मॉड्युलशी संबंधित सर्व केस डायऱ्या ताब्यात घेईल. तसेच, उत्तर प्रदेश एटीएसकडूनही (UP ATS) तपासात सहकार्य घेण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : Pune News पुण्यातील अल कायदाच्या संशयित दहशतवाद्याचे 'ठाणे कनेक्शन' उघड! 'गुप्त बैठकी'बाबत ATS चा मोठा खुलासा )
दहशतवादी मॉड्यूलचा फरीदाबाद ते पुलवामापर्यंतचा 'कनेक्शन'
दिल्लीतील या स्फोटाचा तपास करत असताना फरीदाबाद, सहारनपूर, अनंतनाग ते पुलवामापर्यंतचे 'कनेक्शन' समोर आले आहेत. NIA समोर या प्रकरणातील 'डॉक्टर' असलेल्या दहशतवादी मॉड्युलशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या बाबीची चौकशी करण्याचे मोठे आव्हान आहे. फरीदाबाद येथील या दहशतवादी मॉड्युलला मिळणारा फंडिंग (Funding) आणि या संपूर्ण ऑपरेशनचा मास्टरमाईंड कोण आहे, हे उघड करण्याचे मोठे काम विजय साखरे यांच्या नेतृत्वाखालील टीमला करायचे आहे.
याप्रकरणी आतापर्यंत डॉ. मुझम्मिल शकील, डॉ. आदिल अहमद आणि डॉ. शाहीना यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांचे संबंध फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीशी जोडले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. उमर मोहम्मद नावाचा संशयित हल्लेखोर त्याच कारमध्ये होता, ज्यामध्ये स्फोट झाला आणि ज्यात 12 जणांचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world