NEET-UG परीक्षा घोटाळा आणि पेपर लीक प्रकरणाचे लोण आता ईशान्य भारतातील राज्यांमध्येही वेगाने पसरत आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथील चचल परिसरात गुरुवारी विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. मात्र, या आंदोलनाने त्यावेळी राजकीय वळण घेतले, जेव्हा आसाममधील भाजप-एजीपी युती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री केशव महंता यांची मुलगी दिबिशा महंता थेट रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसली.
दिबिशा महंता यांचे आंदोलनातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, सत्ताधारी युतीमधील मंत्र्याच्या मुलीनेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)
हातात फलक आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
गुवाहाटीतील चचल भागात झालेल्या या आंदोलनात दिबिशा महंता हातात विरोधातील फलक धरून आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्या होत्या. नीट-युजी परीक्षेतील कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
दिबिशा यांचे वडील केशव महंता हे आसाम गण परिषद (AGP) चे वरिष्ठ नेते असून 2016 पासून भाजपप्रणीत एनडीए (NDA) सरकारमध्ये मंत्री आहेत. ते नागाव जिल्ह्यातील कालियाबोर मतदारसंघातून 2006 पासून सलग निवडून येत आहेत. एनडीए सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलीनेच एनडीएच्या केंद्रीय मंत्र्याविरोधात थेट भूमिका घेतल्याने विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
(नक्की वाचा- VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची प्रतिक्रिया
या राजकीय गदारोळानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं की, "आमचे सरकार विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने विरोध करण्याच्या हक्काचा पूर्ण आदर करते. खुद्द आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. मात्र, सध्या आसाम पुराच्या भीषण संकटातून आणि कठीण काळातून जात आहे. त्यामुळे माझे सर्वांना आवाहन आहे की सध्या या नैसर्गिक आपत्तीकडे आणि पूरग्रस्तांच्या मदतीकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world