ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातलं. मात्र आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी देखील ऐन दिवाळीत पाऊस पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये. मराठवाड्यासह खान्देशातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संभाजीनगरसह जालना, धाराशिव, बीड, नाशिक, धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. तर नांदेडच्या वाजेगाव येथे शेख अल्ताफ शेख खय्युम याचा मृत्यू झाला. तो वाजेगाव येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्या वेळी वीज पडून त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पुढील 4 दिवस पाऊस कायम असणार आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विशेषतः मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
Live Update : धुक्यात हरवले रस्ते; लातूर जिल्ह्यात पहाटेपासून गारठा वाढला
लातूर जिल्ह्यात आज सकाळपासून दाट धुक्याने सर्वत्र चादर पसरली आहे. विशेषत: औसा रस्त्यासह अनेक मार्गांवर दृष्टी कमी झाल्याने वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पहाटेपासूनच वाढलेल्या गारठ्यामुळे वातावरणात थंडावा आणि दवाचं प्रमाण वाढलं आहे. रस्त्यावर पांढरं धुकं दाटल्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या काळजीने प्रवास करावा लागत आहे. हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल देणारं हे धुकं, लातूर जिल्ह्यात आज सकाळचं मुख्य दृश्य ठरलं आहे.
Live Update : 6 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी, आंदोलन-सभांवर नियंत्रण
जिल्ह्यात 23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून 6 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. अनेक राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलन, सभा, मिरवणूक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता लक्षात घेता हा आदेश लागू करण्यात आला
Live Update : फटाक्यामुळे शिर्डीत भीषण आग; साड्या, प्रसाद भांडार आणि चप्पल दुकान जळून खाक
शिर्डीत दिवाळीच्या रात्री भीषण आग लागून तीन ते चार दुकाने जळून खाक झाली आहेत. महाद्वार क्रमांक एक समोर अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाल्याच दिसून आलं आहे.
या आगीत एक साडीचं शो-रुम, दोन प्रसाद भांडार आणि एक चप्पलचं दुकान पूर्णपणे भस्मसात झाल्याच सांगीतल जातय.. प्राथमिक माहितीनुसार, फटाक्यामुळे प्रथम साडीच्या शो-रुमला आग लागली. दुकानात सुती वस्त्र आणि साड्या मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि शेजारील तीन ते चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
Live Update : ज्वारी पिकाला पक्ष्यांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड...
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी यंदा परतीच्या पावसामुळे संकटात सापडले आहे तर दुसरी बाजू शेतकऱ्यांच्या ज्वारीला अपेक्षा पेक्षा कमी भाव मिळत असल्याने हैरान शेतकऱ्यांना आता शेतांमध्ये ज्वारीला पक्ष्यांकडून मोठं नुकसान केले जात नुकसानी पासून बचाव करिता ज्वारीच्या प्रत्येक कणसांना प्लास्टिकच्या पिशवीने बांधले आहे
Live Update : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी वंदे भारत आता ६ दिवस धावणार
पंधरा जूनपासून लागू करण्यात आलेलं कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक सोमवारी संपुष्टात आलं. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार वगळता ६ दिवस धावणार आहे. पावसाळ्यात ही सुपरफास्ट एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र आता शुक्रवार वगळून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवारी धावेल. मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी १.१० मिनिटांनी मडगाव येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १० वाजता सीएसएमटी स्थानकात पोहचणार आहे.