जाहिरात

Chanda Kochhar Guilty: Videocon ला 300 कोटींचे कर्ज देण्यासाठी 64 कोटींची लाच घेतली, चंदा कोचर दोषी

Chanda Kochhar Guilty: व्हिडीओकॉन समूहातील एका कंपनीला 300 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी कोचर यांनी 64 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

Chanda Kochhar Guilty: Videocon ला 300 कोटींचे कर्ज देण्यासाठी 64 कोटींची लाच घेतली, चंदा कोचर दोषी
मुंबई:

आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांना कर्जमंजुरीच्या बदल्यात लाच घेतल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.  अपीलीय लवादाने 3 जुलै रोजी या प्रकरणी निकाल देत चंदा कोचर यांना दोषी ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओकॉन समूहातील एका कंपनीला 300 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी कोचर यांनी 64 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता.

( नक्की वाचा: भारतानं ICC स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळलं पाहिजे का? मोहम्मद सिराजनं दिलं उत्तर )

चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या अडचणी वाढल्या

अंमलबजावणी संचालनालयाने सादर केलेले पुरावे हे चंदा कोचर यांनी कर्ज मंजुरीसाठी लाच मागितल्याकडे स्पष्टपणे बोट दाखवत असल्याचे लवादाने म्हटलेले आहे. सेक्शन 50 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबाशी हे पुरावे मेळ खात असल्याचेही लवादाने म्हटले आहे. लाचेची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी व्हिडीओकॉन समूहाच्या एसईपीएल आणि न्यूपॉवर रिन्यूएबल्स (NRPL) या कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. यातील एनआरपीएलवर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे नियंत्रण होते.

( नक्की वाचा: हिंदू संस्कृतीत 'गटारी अमावस्या' असा शब्दच नाही; श्रावणापूर्वी साजरा करतो त्याला काय म्हणतात?  )

लवादाने म्हटले आहे की ज्या समितीने कर्ज मंजूर केले त्या समितीमध्ये चंदा कोचरही होत्या,  परंतु त्यांनी ही बाब उघड केली नाही की ज्या कंपनीला 300 कोटी रुपयांचे कर्ज दिले जात आहे, त्या कंपनीचे,  दीपक कोचर यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. हे आयसीआयसीआय बँकेच्या हितासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणारे होते. 2020 साली याच प्रकरणात एका प्राधिकरणाने चंदा कोचर यांना मोठा दिलासा दिला होता. या प्राधिकरणाने कोचर आणि अन्य काही जणांची जप्त केलेली मालमत्ता मोकळी करण्यास परवानगी दिली होती. प्राधिकरणाच्या या आदेशावरही लवादाने ताशेरे ओढले आहेत. 

आरोपांमुळे द्यावा लागला होता राजीनामा

कर्जाच्या बदल्यात लाच घेतल्याच्या आरोपांनंतर चंदा कोचर यांना ऑक्टोबर 2018 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी तपास पूर्ण होण्याची वाट न पाहता बँकेतून निर्धारित वेळेपूर्वीच निवृत्त होण्याची परवानगी मागितली होती, जी बँकेच्या मंडळाने मंजूर केली. डिसेंबर 2022 मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू असताना चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटकही केली होती.

( नक्की वाचा: धनखडांचा तडकाफडकी राजीनामा; उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील 'या' नेत्याच्या नावाची चर्चा )

कोचर दाम्पत्याने त्यांच्यावर वेळोवेळी लावलेले सगळे आरोप फेटाळले होते. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळानेही त्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती. बोर्डाने म्हटले होते की, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज किंवा इतर कोणत्याही कंपनीला कर्ज देताना हितसंबंधांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झालेले नाही. कोचर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आयसीआयसीआय बँकेतून केली होती. त्यांनी या बँकेत 33 वर्षे काम केले आणि एक  काळ असा होता जेव्हा त्या खासगी बँकींग क्षेत्रातील शक्तिशाली महिला म्हणून ओळखल्या जात होत्या.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com