Dr Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भारतातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना आदरांजली वाहात असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मनमोहन सिंग यांच्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेसच्या सरकारांनी घातलेल्या बेड्या मनमोहन सिंग यांनी तोडल्या!
राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. 1991 ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंग यांनी एक वाक्य वापरलं होतं, "no power on earth can stop an idea whose time has come". थोडक्यात भारताचा काळ सुरू होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग.
नक्की वाचा : मनमोहन सिंगांच्या एकाच फटक्यात मोहम्मद अली जिन्ना गरगरले; वाचा भन्नाट किस्सा
पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, "I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament.... "
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.
नक्की वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांचे दिग्गजांसोबतच्या खास भेटीगाठीचे फोटो
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन..."
राज ठाकरे ।
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world