
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे बांधकाम वेगाने सुरू असून, लवकरच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र त्याआधीच तिच्या तिकीट दरांची चर्चा सुरू झाली असून, मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी सुमारे 3000-5000 इतके शुल्क असू शकते, असा अंदाज आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्थानकांचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने नुकतीच दिली. 'एक्स' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वे मंत्रालयाने पोस्ट केले की, "मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरमधील गुजरातची बुलेट ट्रेन स्थानके पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. आधुनिक डिझाइन, सांस्कृतिक ओळख, अखंड कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणपूरक सुविधांनी ही स्थानके प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलतील."
(नक्की वाचा- Maharashtra Work Hours : राज्यात कामाचे तास 10 होणार; महिलांनाही नाईट शिफ्ट, सरकारने कंबर कसली)
2 तासांत प्रवास, 12 स्थानके
बुलेट ट्रेनचा प्रवास मुंबई ते अहमदाबाद अवघ्या 2 तास आणि 7 मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. तथापि, सर्व 12 स्थानकांवर थांबा घेतल्यास प्रवासाला 2 तास आणि 58 मिनिटे लागतील. या 508 किलोमीटरच्या मार्गावर 12 स्थानके आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार आणि गुजरातमध्ये वापीस बिलीमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती ही आठ स्थानके आहेत.
तिकीट दर किती असणार?
सरकारने अद्याप तिकीट दरांची अधिकृत घोषणा केलेली नाही. एका अहवालानुसार, मुंबई ते अहमदाबाद संपूर्ण प्रवासासाठी प्रवाशांना 3000 ते 5000 पर्यंत खर्च येऊ शकतो. काही रिपोर्ट्समध्ये, कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट दर 250 पासून सुरू होण्याची शक्यता आहे, असेही म्हटले आहे. हा दर एसी फर्स्ट क्लासच्या दरापेक्षा सुमारे 1.5 पट जास्त असू शकतो.
(नक्की वाचा- WhatsApp जबरदस्त फीचर, आता AI मेसेज टाईप करण्यासाठी करणार मदत)
प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितले होते की, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ 2 तास आणि 7 मिनिटांपर्यंत कमी करणारी ही ट्रेन लवकरच सुरू होईल. मात्र, सरकारकडून अद्याप उद्घाटनाची कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. एकूण 508 किलोमीटरच्या या प्रकल्पापैकी 348 किलोमीटरचा मार्ग गुजरातमध्ये, 156 किलोमीटरचा महाराष्ट्रात आणि 4 किलोमीटरचा दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशातून जातो. प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, गुजरातमध्ये स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world