जाहिरात

Exclusive Video : IAF चा मोठा खुलासा: 'ऑपरेशन सिंदूर'च्या हल्ल्यांचे नवे व्हिडिओ NDTV डिफेन्स समिटमध्ये जारी

NDTV Defence Summit : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चे नवे व्हिडिओ आणि तपशील NDTV डिफेन्स समिटमध्ये सादर करण्यात आले.

मुंबई:

NDTV Defence Summit : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चे नवे व्हिडिओ आणि तपशील NDTV डिफेन्स समिटमध्ये सादर करण्यात आले. या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी हल्ल्याचे नियोजन, अंमलबजावणी आणि परिणामांबद्दल सविस्तर माहिती दिली.

एअर मार्शल तिवारी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला एक ऐतिहासिक क्षण म्हटले असून, यामुळे हवाई दल 'भारताची तलवार' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. "आम्ही 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जे काही केले, ती फक्त आमच्या क्षमतेची एक झलक होती," असे ते म्हणाले. या ऑपरेशनबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादी तळ उद्धवस्त

  • या मोहिमेत हवाई दलाला पाकिस्तानच्या हद्दीतील दोन महत्त्वाची लक्ष्ये देण्यात आली होती:
  • मुरिदके: आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेले लष्कर-ए-तैयबाचे (LeT) मुख्यालय.
  • बहावलपूर: पाकिस्तानच्या आत सुमारे 100 किमी अंतरावर असलेले जैश-ए-मोहम्मदचे (JeM) मुख्यालय.

भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेच्या (LoC) जवळची आणखी सात लक्ष्ये दिली गेली होती. एअर मार्शल तिवारी यांनी सांगितले की, प्रत्येक लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी त्याचे छोटे-छोटे भाग निश्चित केले होते, जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल आणि हल्ला अचूक होईल. "आम्ही प्रत्येक शस्त्र मोजून वापरले," असे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : PM Modi : ट्रम्प यांचा मोदींना चार वेळा कॉल, पण मोदींनी घेतला नाही; ‘या' कारणामुळे घेतला निर्णय? )
 

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची शरणागती

मुरिदके येथील हल्ल्यात प्रशासकीय इमारत आणि दोन प्रमुख नेत्यांची निवासस्थाने लक्ष्य करण्यात आली. ड्रोन फुटेजमध्ये सुरुवातीला छतावर केवळ लहान छिद्रे दिसली, पण नंतर स्थानिक व्हिडिओमधून इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. बहावलपूरमध्ये पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली होती, ज्यात प्रशासकीय विभाग, कॅडरची निवासस्थाने आणि नेतृत्वाच्या खोल्यांचा समावेश होता. दोन अचूक शस्त्रांनी अनेक मजल्यांमधून आत घुसून कमांड सुविधा नष्ट केल्या.

एअर मार्शल तिवारी म्हणाले की, "एक चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त बोलते." पाकिस्तानी लष्कराच्या पंजाब कोअर कमांडर, मुख्य सचिव आणि प्रांतीय पोलीस प्रमुखांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवादी नेत्यांच्या अंत्यसंस्कारांना हजेरी लावली होती, यावरून पाकिस्तानचा दहशतवादाला थेट पाठिंबा असल्याचे सिद्ध झाले.

भारतीय लष्कारानं केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे पाकिस्तानला तातडीने शस्त्रसंधीसाठी संपर्क साधावा लागला. 10 मे रोजी संध्याकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी जमीन, हवा आणि समुद्रावरील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान तयार झाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com