
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 जून रोजी जम्मू आणि काश्मीरचा दौरा करणार आहेत. या प्रदेशात रेल्वे पायाभूत सुविधा आणि संचारसंपर्क वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान सकाळी 11 वाजता चिनाब पुलाचे उद्घाटन करतील. त्यानंतर, ते अंजी पुलाला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते वंदे भारत रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, ते कटरा येथे 46,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चिनाब आणि अंजी रेल्वे पूल
स्थापत्यशास्त्रातील अद्भुत असा चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून 359 मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा 1,315 मीटर लांबीचा पोलादी कमानदार पूल आहे जो भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आरेखित केलेला आहे. या पुलाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे जम्मू आणि श्रीनगरमधील संचारसंपर्क आता वाढू शकेल. पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीला कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त 3 तास लागतील, ज्यामुळे सध्याचा प्रवासवेळ 2-3 तासांनी कमी होईल. अंजी पूल हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे जो आव्हानात्मक प्रदेशात देशाची सेवा करेल.
(नक्की वाचा- Explainer: चिनाब रेल्वे पूलाचं स्वप्न अखेर पूर्ण! चीन-पाकिस्तानचं का वाढलं टेन्शन? वाचा संपूर्ण माहिती)
संचारसंपर्क प्रकल्प आणि इतर विकास उपक्रम
पंतप्रधान उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबी आर एल) प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 43,780 कोटी रुपये खर्चाच्या या 272 किमी लांबीच्या या युएसबी आर एल प्रकल्पात 36 बोगदे (119 किमी लांबीचे) आणि 943 पूल समाविष्ट आहेत. हा प्रकल्प काश्मीर खोरे आणि देशाच्या उर्वरित भागांमध्ये सर्व हवामानात, अखंड रेल्वे जोडणी प्रस्थापित करतो ज्याचा उद्देश प्रादेशिक गतिशीलता बदलणे आणि सामाजिक-आर्थिक एकात्मता वाढवणे, असा आहे.
पंतप्रधान श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर आणि परत अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्या रहिवासी, पर्यटक, यात्रेकरू आणि इतरांसाठी जलद, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध करतील.
( नक्की वाचा : भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट!)
सीमावर्ती भागात, विशेषतः शेवटच्या मैलापर्यंतच्या संचारसंपर्काला चालना देण्यासाठी पंतप्रधान विविध रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. ते राष्ट्रीय महामार्ग-701 वरील रफियाबाद ते कुपवाडा पर्यंतच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची तसेच राष्ट्रीय महामार्ग-444 वरील शोपियां बायपास रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी करतील, ज्याचा खर्च 1,952 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते श्रीनगरमधील राष्ट्रीय महामार्ग-1 वरील संग्राम जंक्शन आणि राष्ट्रीय महामार्ग-44 वरील बेमिना जंक्शन येथे दोन उड्डाणपूल प्रकल्पांचे उद्घाटनदेखील करतील. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांसाठी वाहतुकीचा प्रवाह वर्धित होईल.
पंतप्रधान कटरा येथे 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय उत्कृष्टता संस्थेची पायाभरणी देखील करतील. हे रियासी जिल्ह्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय असेल जे या प्रदेशातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे योगदान देणारे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world