
पतीकडून होणारा मानसिक छळ आणि घटस्फोटासाठी (Divorce) वाढत्या दबावामुळे एका 30 वर्षाच्या विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उटललं. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक अत्यंत भावनिक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आहे. तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तिने आपल्या मृत्यूसाठी थेट पतीला जबाबदार धरले आहे. ही खळबळजनक घटना गोंडा जिल्ह्यातील नगर कोतवाली इंदिरा नगर येथील आहे. जिथे नाजिया इस्माईल शेख (Nazia Ismail Shaikh) या महिलेने सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजता माहेरच्या घरात स्वतःला खोलीत कोंडून घेत आत्महत्या केली.
मृत्यूच्या अगदी आधी बनवलेल्या 4 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये नाजियाने असा दावा केला आहे की, तिचा पती इस्माईल शेख तिच्यावर सातत्याने घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत आहे. शिवाय तिचा हुंड्यासाठी (Dowry) छळ केला जात आहे. मात्र आपण घटस्फोट देण्यास नकार दिल्यावर इस्माईल तिला शिवीगाळ करतो. शिवाय मानसिक त्रास ही देत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नाजियाने म्हटले आहे. याबाबतचा तिने एक व्हिडीओ तयार केला आहे. तोच व्हिडीओ तिने सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.
नाजिया इस्माईल शेखचे लग्न 2022 मध्ये सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या इस्माईल शेखसोबत झाले होते. इस्माईल आपल्या कुटुंबासह मुंबईत राहून व्यवसाय करतो. लग्नानंतर काही काळानंतरच पतीने नाजिया आणि तिच्या कुटुंबाला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच तो वारंवार नाजियावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. कुटुंबीयांनी सांगितले की, समेट घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण छळ कमी झाला नाही.
नाजियाच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरच्या कुटुंबात मोठी खळबळ उडाली. मृत नाजियाच्या वडिलांनी नगर कोतवाली पोलीस ठाण्यात पती इस्माईल शेख याच्या विरोधात छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृतकेच्या वडिलांची तक्रार आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर तपास सुरू केला आहे.दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ही दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world