
योगेश शिरसाट
सगळीकडे दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. मग तो गरिब असो की श्रीमंत तो आपल्या पद्धतीने हा सण करतोय. पण त्याला अपवाद आहेत अकोल्यातील रघुनाथ अरबट. हे दिवाळी साजरी करत नाही. कारण त्यांचं दिवाळं निघालं आहे. हे दिवाळं दुसरं तिसरं कुणी नाही तर त्यांच्याच मावस भावाने काढले आहे. अरबट यांच्या मावस भावाने त्यांना जवळपास 32 लाखांना चूना लावला आहे. त्याबाबत तक्रार करून ही कोणती कारवाई होत नाही. त्यामुळे रघुनाथ यांनी दिवाळीलाच एक अनोख आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. त्यांच्या या आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा आहे.
रघुनाथ हे बिल्डिंग मटेरियल व्यापारी आहेत. यांच्यासोबत मावस भावानेच 32 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यापूर्वी उघडकीस आली होती. रघुनाथ यांच्याकडे अनेक मजूर काम करतात. त्यांची मजूरी देण्यासाठी म्हणून त्यांनी आपला मावस भाऊ सागर कान्हेरकर याच्या पैसे दिले होते. पण सागरने या मजूरांना मजूरी दिलीच नाही. तो ते सर्व पैसे घेवून फरार झाला. मजूरांचे पैसे बुडाले. मजूरांना दिवाळीला द्यायला ही पैसे रघुनाथ यांच्याकडे नाहीत असं ते म्हणाले.
भावानेच आपली फसवणूक केल्याचा रघुनाथ यांचा आरोप आहे. याबाबत सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा ही दाखल झाला आहे. मात्र पोलिसांनी आरोपीला सात महिन्यानंतर अटक केली. असं असलं तरी त्याच्याकडून एक रुपयाही रिकव्हर झालेला नाही. आरोपीची पत्नी तेजस्विनी हिची चौकशी ही पोलीसांनी केली नाही. या अन्याया विरोधात आणि पोलिस प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात रघुनाथ अरबट यांनी दिवाळीच्या दिवशीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केले.
मला न्याय मिळाला पाहीजे. माझ्यावर अन्याय झाला आहे. पोलीसांनी एक रूपयाचीही रिकव्हरी केली नाही. मी भावावर विश्वास टाकला होता. सर्व व्यवहार त्याच्या हातात दिला होता. पण त्याने पाठीत खंजिर खूपसला. माझी दिवाळी खराब झाली आहे. त्याने माझे चेकबूक, हिशोबाची डायरी ही गायब केली आहे. मोबाईल वापरून त्याचा गैरवापर केला आहे असा आरोप ही त्यांनी या निमित्ताने केला आहे. अर्धनग्न आंदोलन केल्याने तरी पोलीसांचे डोळे उघडतील असं ते म्हणाले. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत मागे हटणार नाही असं ही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world