
रामराजे शिंदे, नवी दिल्ली
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेतून येणाऱ्या कापसावरील 11% आयात शुल्क तात्पुरते रद्द करण्याच्या निर्णयामुळे देशातील, विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखा आहे, असेही ते म्हणाले.
काय आहे नेमका निर्णय?
केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारने 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी अमेरिकेतून येणाऱ्या कापसावरील 11% आयात शुल्क रद्द केले आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा भारतातील कापूस बाजारात येण्याआधीच अमेरिकेतील कापूस भारतात येऊन साठा करेल. यामुळे भारतातील शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आल्यावर त्याला योग्य भाव मिळणार नाही.
(नक्की वाचा- Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत?)
शेतकऱ्यांवर होणारा परिणाम
केजरीवाल म्हणाले की, अमेरिकेतील कापूस भारतातील कापसापेक्षा स्वस्त असेल. यामुळे भारतीय कापड उद्योग अमेरिकेतून येणारा कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी करतील. ऑक्टोबर महिन्यापासून आपल्या देशातील शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येण्यास सुरुवात होईल, तेव्हा उद्योजक आधीच अमेरिकेचा कापूस खरेदी केलेला असल्याने भारतीय कापसाला मागणी कमी होईल. याचा थेट परिणाम गुजरात, विदर्भ, पंजाब, आणि तेलंगणा या भागांतील शेतकऱ्यांवर होईल, जिथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात.
नक्की वाचा : Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, हे आहेत पर्यायी मार्ग)
केजरीवाल यांचा थेट हल्ला
यावेळी केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "जेव्हा असे निर्णय येतात, तेव्हा शेतकरी आत्महत्या करतात. मोदीजींनी हा शेतकऱ्यांशी विश्वासघात केला आहे. आपण अमेरिकेवरचा कर वाढवायला हवा होता, तो 10 टक्क्यांवरून 50 टक्के करायला हवा होता. त्यांनी इतर देशांचे उदाहरण देत सांगितले की, बाकीच्या देशांनी अमेरिकेच्या दबावाखाली झुकून कर वाढवला. आपला देश कमकुवत आहे का? पंतप्रधानांनी 50% कर लादण्याऐवजी 100% कर लादायला हवा होता," असे म्हणत त्यांनी मोदी सरकार अमेरिकेसमोर झुकले असल्याचा आरोप केला.
केजरीवाल यांनी आपल्या भाषणात, कापसावरील 11% शुल्क तात्काळ पुन्हा लागू करण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world