60 Days Fruit Challenge: मी स्वतःला कायम निरोगी समजत होते, पण जेव्हा मी 60 दिवस रोज फळांचे सेवन केले, तेव्हा अवघ्या 10-15 दिवसांतच माझ्या शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागले. उदाहरणार्थ पचनप्रक्रिया सुधारली, ऊर्जा वाढली आणि जंक फुड खाण्याची इच्छा कमी झाली. हा अनुभव माझ्या टीममधील सदस्य दीक्षा सोनीचा आहे. दीक्षाने अलीकडेच तिच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले आणि त्याचे परिणाम थक्क करणारे असल्याचे तिने सांगितले. आपणा सर्वांनाच माहिती आहे की वेळ आणि तंत्रज्ञानासह काम करण्याची पद्धतही बदलतेय. महिला आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. दीक्षाच्या बाबतीतही हेच घडत होते. हॉटेलमधील तळलेले पदार्थ, कामाचा ताण आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे तिला सतत थकवा, पोटाचे विकार आणि एकाग्रतेचा अभाव जाणवत होता.
60 दिवस रोज फळं खाण्याचा निर्णय का घेतला?
दीक्षाने सांगितलं की बहुतांश वेळेस आउटडोअर शुटिंग, वेळेवर न खाण्याची सवय आणि सातत्याने होणारा स्क्रीनचा वापर यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते. वरवर पाहता शरीर निरोगी वाटत असले तरीही आतून शरीर साथ देत नसल्याची जाणवत होते.
तेव्हा एक दिवस जिम ट्रेनरने मला सांगितले की, कमीत कमी दोन महिने रोज फळं खा आणि मग फरक अनुभव.
(नक्की वाचा: Summer Health Tips: उन्हाळ्यात सतत तोंड कोरडं पडतंय? शरीराचा हा 'वॉर्निंग सिग्नल' वेळीच ओळखा, अन्यथा...)
"खरं सांगू तर मला हा सल्ला मुळीच पटला नव्हता. मग मी विचार केला की 60 दिवस फळं खाऊन पाहते आणि येथून माझ्या जीवनात एक छोटासा प्रवास सुरू झाला"

मी 60 दिवस रोज काय केले?
रोज कमीत कमी दोन फळं खाण्याचं मी ठरवलं. कधी सफरचंद, केळ, पपई, संत्रे किंवा हांगमी फळांचा माझ्या डाएटमध्ये समावेश होऊ लागला. सुरुवातीला ही सवय विचित्र वाटत होती, हळूहळू ही सवय माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली.

सुरुवातीस पोट जड होणे आणि बद्धकोष्ठतेची समस्या होती. पण 10-12 दिवसांत यापासून सुटका मिळाली. फळांमधील फायबरमुळे पचनप्रक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधारले.
2. शरीर हलके झाले आणि ऊर्जा वाढली
सुरुवातीस शरीरात दिवसभरात आळस जाणवायचा पण आता सकाळी उठल्यानंतर फरक जाणवू लागला आहे. फळांमधील नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन्समुळे शरीराला ऊर्जा मिळू लागली.
(नक्की वाचा: Bottle Gourd Dosa: दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा कुरकुरीत डोसा, वेटलॉसह मिळतील असंख्य फायदे)
3. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढली
सर्दी-खोकला यासारख्या समस्या कमी होऊ लागल्या. फळांमधील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊ लागली.

4. वजन नियंत्रणात आले
वेगळे असे कोणत्याही प्रकारचे डाएट मी फॉलो केले नव्हते, पण जंक फुडचे सेवन कमी झाले कारण फळांमुळे पोट भरलेले राहू लागले. तसेच जंक फुड खाण्याची इच्छा कमी होऊ लागली. फळांमधील फायबरमुळे वजन नियंत्रणात आले.
5. हृदय आरोग्य आणि रक्तदाब
दोन महिन्यानंतर माझ्या शरीराचा बीपी पूर्वीपेक्षा अधिक स्थिर झाला होता. फळ आणि भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास आणि हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
6. मेंदू आणि मूडवरील परिणाम
आश्चर्यकारक बाब म्हणजे पूर्वीपेक्षा शांत आणि मन एकाग्र झाल्याचे जाणवू लागलं. फळं आणि भाज्यांमधील व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर मेंदूतील मन प्रसन्न करणाऱ्या रसायनांची पातळी संतुलन करण्याचे काम करतात, ज्यामुळे मनःस्थिती आणि एकूणच आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

सर्वात मोठे सरप्राइज काय होते?
डाएटमधील बदलाचे परिणाम शरीरावर हळूहळू होतील, असे मला वाटत होते. पण सुरुवातीच्या 10–15 दिवसांतच शरीरात बदल होत असल्याचे जाणवले.
केवळ फळं खाल्ल्याने सर्वकाही ठीक होते का?
नाही. केवळ फळांचे सेवन करणं पुरेसे नाही. संतुलित आहार, जास्त प्रमाणात पाणी आणि अॅक्टिव्ह लाइफस्टाइल देखील आवश्यक आहे. रोज जवळपास 400 ग्रॅम फळं आणि भाज्यांचे सेवन करणं आरोग्यसाठी फायदेशीर मानले जाते.

60 दिवसांचे चॅलेंज
60 दिवस पूर्ण झाल्यानंतर मी हे विश्वासाने सांगू शकते की माझ्या एका छोट्याशा सवयीमुळे संपूर्ण शरीरावार परिणाम दिसला. तुम्ही देखील फळं खाणे टाळताय तर एक दिवस स्वतःला 60 दिवसांचे चॅलेंज देऊन पाहा. कदाचित तुम्हाला तुमच्या शरीरात असे बदल दिसतील, ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल.
NOTE: ही माहिती दीक्षाच्या वैयक्तिक दिनचर्या आणि सवयींवर आधारित आहे. फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, पण कोणतंही डाएट फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
आरोग्य सुधारण्यासाठी नेहमीच मोठे बदल करण्याची गरज नसते. 60 दिवस दररोज फळे खाण्यासारख्या छोट्या सवयीचाही पचनक्रिया, ऊर्जा, प्रतिकारशक्ती आणि मनःस्थितीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर एक छोटे पाऊल उचलून स्वतःला एक संधी द्या. परिणाम तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर दिसू शकतात.
FAQs
Q1. रोज फळ खाल्ल्यास किती दिवसांत शरीरात बदल दिसतील?
- काही लोकांना 10–15 दिवसांत पचनप्रक्रिया, शारीरिक ऊर्जा यासारख्या गोष्टींमध्ये फरक जाणवेल. पण प्रत्येक व्यक्तीच्या लाइफस्टाइल आणि आरोग्यावर हे सर्व काही अवलंबून असते.
Q2. रोज फळं खाल्ल्यास वजन कमी होतं?
- फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते आणि जंक फुड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
Q3. दिवसभरात किती फळं खाणे योग्य ठरेल?
- साधारणतः रोज दोन ते तीन हंगामी फळं आणि भाज्यांचे सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Q4. केवळ फळं खाऊन शरीर निरोगी राहील का?
- नाही. फळं खाणे शरीरासाठी आवश्यक आहे. पण संतुलित डाएट, पुरेशा प्रमाणात पाणी अॅक्टिव्ह लाइफस्टाइल देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world