Alcohol Effects on Women: एकाच पार्टीत किंवा गेट-टुगेदरमध्ये पाहिले जाते की, महिला आणि पुरुष दोघांनीही समान प्रमाणात मद्य (Alcohol) प्यायले, तरी महिलांना त्याचा परिणाम लवकर आणि जास्त जाणवतो. अनेकांसाठी हा गंमतीचा विषय असतो किंवा काही जण याला शारीरिक कमकुवतपणा मानतात. पण तुम्हाला माहित आहे का, यामागे काही ठोस वैज्ञानिक कारणे आहेत. दारूचा शरीरावर होणारा परिणाम केवळ प्रमाणावर किंवा ब्रँडवर अवलंबून नसतो; तो थेट आपल्या शारीरिक रचना, चयापचय क्रिया (Metabolism) आणि रासायनिक फरकांशी जोडलेला असतो.
महिला आणि पुरुषांच्या शरीरात अनेक जैविक (Biological) फरक असतात आणि हेच फरक मद्याच्या (Alcohol) परिणामांनाही बदलतात. 'जेवढं तो/ते पिऊ शकतो, तेवढंच मीही पिऊ शकेन' असा विचार करणाऱ्या महिलांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे, कारण शरीर नेहमी समान प्रतिक्रिया देत नाही. आजच्या जगात तणाव आणि सामाजिक दडपण वाढल्यामुळे मद्यसेवन वाढत आहे. त्यामुळे, शरीराची ही रासायनिक प्रक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
महिलांना दारु लवकर का चढते?
मद्यसेवनानंतर महिलांना पुरुषांच्या तुलनेत लवकर नशा चढण्याची तीन प्रमुख कारणे आहेत, ज्यांचा आधार त्यांच्या नैसर्गिक शारीरिक रचनेत आहे.
1. कमी 'अल्कोहोल मेटाबॉलाइजिंग एन्झाईम'
शरीरात 'अल्कोहोल डिहायड्रोजनेज' (Alcohol Dehydrogenase - ADH) नावाचे एक एन्झाईम असते. हे एन्झाईम दारुला (Alcohol) तोडून शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते. अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, महिलांमध्ये या एन्झाईमची मात्रा पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या कमी असते. याचा अर्थ असा होतो की, महिलांच्या शरीरात मद्य हळू हळू विरघळते आणि जास्त काळ रक्तात तसेच राहते. परिणामी, मद्याचा प्रभाव लवकर आणि तीव्रतेने जाणवतो. समान प्रमाणात दारु पिल्यानंतरही महिलांना जास्त नशा जाणवण्यामागे हे मुख्य कारण आहे.
( नक्की वाचा : Healthy Diet: एका दिवसात किती शेंगदाणे खावे? कुणी अजिबात खाऊ नये? फायदे, तोटे आणि 17 प्रश्नांची उत्तरं (FAQ) )
2. शरीरातील जास्त फॅटचे (Fat Percentage) प्रमाण
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात चरबीचे (Fat) प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असते. फॅटमध्ये (Fat) अल्कोहोल शोषून घेण्याची किंवा जमा करण्याची क्षमता असते. त्यामुळे अल्कोहोल शरीरात दीर्घकाळ टिकून राहते, ज्यामुळे त्याचा प्रभाव अधिक काळ कायम राहतो. याचा सरळ अर्थ असा होतो की, नशा केवळ लवकर चढत नाही, तर ती उतरण्यासाठीही जास्त वेळ लागतो.
3. शरीरात पाण्याची कमी मात्रा
शरीरात असलेले पाणी मद्याला पातळ (Dilute) करण्याचे काम करते. पुरुषांच्या शरीरात पाण्याची मात्रा जास्त असल्यामुळे अल्कोहोल लवकर मिसळून त्याचा गाढपणा (Concentration) कमी होतो. याउलट, महिलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने अल्कोहोल जास्त गाढ राहते. यामुळे रक्तातील त्याची तीव्रता अधिक राहते आणि नशा वेगाने चढायला सुरुवात होते.
( नक्की वाचा : Saudi Arabia Bus Accident: मक्का-मदीनामध्ये मृत्यू झाल्यास मृतदेह का परत आणता येत नाही? काय आहे नियम? )
लक्षात ठेवा: दारु कोणत्याही व्यक्तीसाठी सुरक्षित नाही
जागतिक आरोग्य संघटना (WHO) यासह अनेक संस्थांनी हे स्पष्ट केले आहे की, मद्याची कोणतीही मात्रा सुरक्षित नाही. ती लहान असली तरी यकृत (Liver), हृदय (Heart), मेंदू, झोप आणि मानसिक आरोग्याचे नुकसान करू शकते. विशेषतः महिलांमध्ये मद्यसेवनामुळे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), हार्मोनल असंतुलन आणि यकृताच्या (Liver) विकारांचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे, हे वैज्ञानिक फरक केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठी आहेत आणि मद्यसेवनापासून दूर राहणे हेच सर्वोत्तम आरोग्य सूत्र आहे.
( स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर अधारित आहे. हा कोणत्याही योग्य उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या तज्ज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क या माहितीच्या जबाबदारीचा दावा करत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world