तुम्ही फिट राहण्यासाठी जिममध्ये जे 'स्टायलिश' आणि घट्ट कपडे (Activewear) घालता, तेच तुमच्या आरोग्यासाठी शत्रू ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये खेळाडूंच्या कपड्यांमधील घातक रसायनांची चौकशी सुरू झाल्यानंतर आता भारतीय बाजारपेठेत मिळणाऱ्या जिम वेअरबाबतही तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. या कपड्यांमुळे केवळ त्वचेचेच नव्हे, तर शरीरातील संप्रेरकांचे (Hormones) संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
13 एप्रिल रोजी टेक्सासचे ॲटर्नी जनरल केन पॅक्सटन यांनी जाहीर केले की, खेळांच्या कपड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशा रसायनांची चौकशी केली जात आहे, जी मानवी शरीरातील अंतःस्रावी प्रणालीमध्ये (Endocrine System) हस्तक्षेप करतात. ही रसायने कापडाला लवचिकता, घाम शोषण्याची क्षमता आणि दुर्गंधी रोखण्यासाठी वापरली जातात.
(नक्की वाचा- Strait of Hormuz: 'स्ट्रेट ऑफ होर्मूज'मधून जहाज भारतात किती वेळात पोहोचतात? जाणून घ्या या मार्गाचे महत्त्व)
कपड्यांबाबत चिंतेची बाब काय?
भारतात कडक उन्हाळा आणि दमट हवामान असल्याने सिंथेटिक कपड्यांचा वापर अधिक धोकादायक ठरतो. त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. कबीर सरदाना यांच्या मते, घट्ट आणि सिंथेटिक कपड्यांमुळे बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infections), त्वचेची जळजळ आणि पुरळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीरातील ज्या भागांत घाम जास्त येतो (उदा. कंबर, मांड्या), तेथून ही रसायने त्वचेद्वारे शरीरात वेगाने शोषली जातात. कपड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणारे 'PFAS' आणि 'Phthalates' हे जागतिक स्तरावर हार्मोनल बदलांशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले आहे.
भारतीय बाजारपेठेत नियमावलीचा अभाव
भारतात सध्या सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. आंतरराष्ट्रीय ब्रँड्सपासून ते स्थानिक कंपन्यांपर्यंत सर्वजण रासायनिक प्रक्रिया केलेल्या कापडाचाच वापर करतात. भारतात अशा रसायनांच्या संपर्कामुळे होणारे शरीरातील अंतर्गत बदल मोजण्यासाठी अद्याप पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Dombivli News: डोंबिवलीकरांना उन्हात महावितरणचा 'शॉक'; ग्राहकांना 100 ते 5000 रुपये भरण्याच्या नोटीसा)
कोणते कपडे चांगले?
जिममध्ये व्यायाम करताना शक्यतो नैसर्गिक फायबर किंवा सुती मिश्रित कपड्यांचा वापर करा. नवीन घेतलेले जिम वेअर वापरण्यापूर्वी किमान दोनदा धुवून घ्या. अत्यंत घट्ट कपड्यांऐवजी थोडे मोकळे आणि हवा खेळती राहील असे कपडे निवडा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world