
Remedy for Burning Urine: लघवी करताना जळजळ होणे, खाज येणे किंवा लघवी करताना ओटीपोटाच्या भागामध्ये वेदना होणे; या समस्या सामान्य आहेत. सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे, शरीरामध्ये वाढलेली उष्णता, बॅक्टेरिअल इंफेक्शन, तिखट पदार्थांचे अतिरिक्त सेवन किंवा पाणी कमी प्रमाणात पिणे यासारख्या गोष्टी समस्येकरिता कारणीभूत असू शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या अधिकतर आढळते. या समस्येच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही घरगुती उपाय करू शकता. नुकतेच आयुर्वेदिक न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी आपल्या इन्स्ट्राग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करुन यासंदर्भातील टिप्स सांगितल्या आहेत.
लघवी करताना होणाऱ्या जळजळीतून सुटका कशी मिळवावी?
न्युट्रिशनिस्ट शाह यांनी बेकिंग सोड्याचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. एक ग्लास पाण्यामध्ये 1/4 चमचा बेकिंग सोडा मिक्स करावा आणि हे पाणी हळूहळू प्यावे. हा उपाय केल्यास तुम्हाला लगेचच आराम मिळू शकतो.
बेकिंग सोडा पिण्याचे फायदे
बेकिंग सोड्यातील अल्कलाइन नेचर शरीरातील अॅसिडिटी कमी करते, यामुळे मूत्रमार्गाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो. लघवी करताना होणारी जळजळ कमी होण्यास मदत मिळेल. पण मर्यादित स्वरुपात बेकिंग सोड्याचे पाणी पिण्याचा सल्ला न्युट्रिशनिस्ट दिलाय. आवश्यकता भासल्यासच बेकिंग सोड्याचे पाणी प्यावे, असे आवर्जून त्यांनी सांगितलंय.
(नक्की वाचा: Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय? झोपण्यापूर्वी दूध किंवा पाण्यात मिक्स करा या गोष्टी, मग पाहा कमाल)
अन्य कोणते उपाय करावे?
- लघवी करताना जळजळ होण्याच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी अन्य कोणते उपाय करावे, जाणून घेऊया माहिती...
- जास्तीत जास्त पाणी प्यावे. दिवसभरात साधारणतः आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- इंफेक्शन होऊ नये म्हणून स्वच्छतेची काळजी घ्यावी.
- दीर्घ काळ लघवी रोखून ठेवू नये.
- नारळाचे पाणी, ताक, लिंबू पाणी यासारख्या पेयांचा डाएटमध्ये समावेश करावा.
- तेलकट, तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावे. याऐवजी ताज्या फळ-भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करावा.
डॉक्टरांशी संपर्क कधी साधावा?
लघवीतून रक्त येत असल्यास, ताप असल्यास, पोट किंवा पाठ तीव्र स्वरुपात दुखत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा. कारण घरगुती उपाय केवळ सौम्य लक्षणांकरिता फायदेशीर ठरू शकतात.
(नक्की वाचा: Urine Problem Ayurvedic Remedy: लघवीला फेस येतोय? या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world