Cardamom Benefits: भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हिरव्या वेलचीचे विशेष महत्त्व आहे. स्वयंपाकाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. पण तुम्हाला वेलचीचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का? प्रसिद्ध योगगुरू हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वेलचीबाबत महत्त्वाची माहिती सांगितलीय. सलग 15 दिवस दोन हिरवी वेलची खाल्ल्यास शरीरामध्ये कोणकोणते बदल पाहायला मिळू शकतात, याबाबत योगगुरूंनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
रोज दोन वेलची खाण्याचे फायदे | Eating Benefits Of Cardamom
तोंडाला येणारा दुर्गंध दूर होतो
डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, वेलचीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येण्यास कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियांचा खात्मा होतो. म्हणून पूर्वीच्या काळी राजा-महाराजा जेवणानंतर वेलची खात असत. यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही.
सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळेल
बदलत्या हवामानानुसार सर्दी-खोकल्याच्या समस्येमुळे बहुतांश लोक त्रस्त असतात. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी वेलची खाणे फायदेशीर ठरेल. वेलचीची प्रकृती उष्ण आहे, यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत मिळेल आणि श्वसनमार्गातील अडथळेही दूर होतील.
पचनप्रक्रिया सुधारेल
वेलचीतील पोषणतत्त्वांमुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल. वेलचीमुळे पाचक एंझाइम्स सक्रिय होतात. त्यामुळे जेवणानंतर एक किंवा दोन वेलची चघळल्यास गॅस, पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल. शिवाय अन्नाचंही सहजरित्या पचन होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Weight Gain Causes: झोप येत नाहीय, मूड खराब आणि वजनही वाढतेय; शरीरात हे व्हिटॅमिन झालंय कमी)
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
वेलचीतील घटक हृदयाच्या आरोग्यासाठीही पोषक आहेत. योगगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, वेलचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, जे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मिठाचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करतात. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयावरील ताण कमी होतो. कित्येक संशोधनातील माहितीनुसार, नियमित स्वरुपात वेलचीचे सेवन करणे हाय ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
(नक्की वाचा: Why You Should Stop Eating Rice: 30 दिवस भात खाल्ला नाही, तर काय होईल?)
वेलचीचे सेवन कसे करावे?
- हंसा योगेंद्रे यांनी सांगितले की, जेवण केल्यानंतर दोन वेलची चघळून खा.
- वेलची पावडर, मध, लिंबू आणि चिमूटभर काळी मिरी पावडर एकत्रित मिक्स करुन चाटण तयार करू शकता. यामुळे खोकल्याची समस्या दूर होईल.
- वेलचीचा हर्बल चहा पिऊ शकता. पाण्यामध्ये तीन ते चार वेलची, दालचिनी आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करून चहा तयार करून प्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

