Why You Should Stop Eating Rice: भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये भात हा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना भात खायला आवडते. काही लोक तर भाताशिवाय जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. पण आहारातून भात वर्ज्य केले तर शरीरावर कोणते परिणाम होतील? याचा तुम्ही विचार केलाय का. भात खाणे कायमचे बंद केल्यास शरीरामध्ये कोणकोणते बदल दिसतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
कधी वरणभात, खिचडी तर कधी पुलाव, एकूणच भाताशिवाय जेवणाची थाळी अपूर्णच. पण महिनाभर तुम्ही भात खाल्लाच नाही तर? ऐकायला थोडेसे विचित्र वाटतंय ना. पण डाएटमध्ये तुम्ही हा छोटासा बदल केला तर कित्येक फायदे मिळतील.
महिनाभर भात न खाल्ल्यास काय होईल? | Mahinabhar Bhat Na Khallyas Kay Hoil | What Happens When You Stop Eating Rice For One Month
भात वर्ज्य केल्यानंतर सुरुवातीचे दिवस थोडे कठीण वाटतील
जेव्हा तुम्ही अचानक भात खाणे बंद कराल तेव्हा ही सवय मोडण्यास थोडासा वेळ लागेल. सुरुवातीचे काही दिवस जास्त भूक लागू शकते, कमकुवतपणा जाणवू शकतो, चिडचिड देखील होऊ शकते. कारण भातामुळे शरीराला लगेचच ऊर्जा मिळते आणि भात न खाल्ल्यास सुस्तपणा जाणवतो. भाताऐवजी आहारामध्ये बाजरी, जवस, किनोआ, रताळे किंवा डाळींचा समावेश करावा.
महिनाभर भात न खाल्ल्यास वजन कमी होईल?
भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते आणि भात पचायलाही हलका आहे. भात खाणे वर्ज्य केल्यास शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण घटते, परिणामी वजनही कमी होऊ लागते. वेटलॉस करण्याची इच्छा असणाऱ्यांनी डाएटमध्ये दलिया, ओट्स, बाजरी यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही.
रक्तशर्करेवर काय परिणाम होतील?
पांढऱ्या रंगाच्या तांदळाचे लवकर पचन होते आणि भातामुळे रक्तशर्करेची पातळी दुपट्ट वेगाने वाढते. महिनाभर तांदूळ खाणे बंद केल्यास रक्तशर्करेची पातळी स्थिर राहण्यास मदत मिळू शकते. म्हणूनच मधुमेहग्रस्तांना भात न खाण्याचा सल्ला दिला जोता.
पचनप्रक्रियेमध्ये होतील बदल
भात खाणे बंद केल्यास पचनप्रक्रियेवरही परिणाम होतील, काही लोकांच्या पोटाला आराम मिळेल. गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते. भात खाणं बंद केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पोटाच्या आरोग्यात थोडेसे बदल दिसतील. भाताऐवजी आहारामध्ये भाज्या, फळे आणि अख्ख्या धान्यांचा समावेश केल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल.
पोषणतत्त्वांच्या कमतरतेचा धोका?
तांदळामध्ये व्हिटॅमिन बी असते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. भात खाणे बंद केल्यास शरीरामध्ये व्हिटॅमिन बीची कमतरता निर्माण होऊ शकते, यामुळे थकवा येणे, मूड बदलणे आणि काहीतरी खाण्याची इच्छा होणे; यासारखे बदल शरीरामध्ये दिसू शकतात. पोषणतत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी डाएटमध्ये भाज्या, अंडी, दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.
(नक्की वाचा: Digestive Tips: सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होत नाही? डॉक्टर हंसा योगेंद्र यांच्या 5 टिप्स करा फॉलो)
भात पूर्णपणे वर्ज्य करावा की खाण्याचे प्रमाण कमी करावे?
भात पूर्णपणे खाणे सोडणे आवश्यक नाही पण भात खाण्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. याऐवजी ब्राउन राइस, बाजरी, जव, ओट्स, किनोआ यासारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारामध्ये समावेश करावा. कारण यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते.
(नक्की वाचा: Health Benefits Of Eating Curd Daily: सलग 30 दिवस दही खाल्ल्यास मिळतील हे 5 मोठे फायदे)
महिनाभर भात खाणे बंद केल्यास वजन कमी होऊ शकते, रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात येऊ शकते आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहील. पण सुरुवातीच्या काळात थकवा जाणवेल किंवा वारंवार भूक लागू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

