
सोशल मीडियावर सध्या एक नवीन ट्रेंड व्हायरल होताना दिसतोय. दावा करण्यात येतोय की 'केशर' (Saffron) हे नैराश्य दूर करण्यासाठीचा नैसर्गिक उपाय आहे. (Natural Antidepressant) केशराचा उपयोग फक्त त्वचा चांगली व्हावी, त्वचेच्या समस्या असल्यास त्या दूर करण्यासाठी केला जात नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही होतो असाही दावा केला जातोय. पण हे दावे खरे आहेत का? किंवा या दाव्यांना वैज्ञानिक आधार आहे का? असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. तज्ज्ञांनी वस्तुस्थिती मांडत याबद्दलची अधिक माहिती दिली आहे.
( नक्की वाचा: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही छोटी-छोटी पाने, स्पर्शही करणार नाही या 4 गंभीर समस्या )
केशराबद्दलच्या दाव्यांवर तज्ज्ञ काय म्हणतात ?
आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना बत्रा यांनी एनडीटीव्ही प्रॉफीटशी बोलताना म्हटले की, केशरमध्ये क्रोसीन (Crocin) आणि सॅफ्रानल (Safranal) सारखी बायोएक्टिव्ह संयुगे असतात. ही संयुगे सेरोटोनिन (Serotonin) आणि डोपामाइन (Dopamine) यांसारख्या न्यूरोट्रांसमीटर्सवर परिणाम करतात, जे आपल्या मूड आणि भावनांना नियंत्रित करण्याचे काम करतात. 2019 मध्ये झालेल्या एका मेटा-अॅनालिसिसनुसार, कमी ते मध्यम नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये केशरच्या सप्लिमेंट्समुळे नैराश्याची लक्षणे कमी झाल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही, तर एका अभ्यासात तर कमी कालावधीसाठी केशराचे सेवन केल्यास ते फ्लुओक्सेटीन (Prozac) नावाच्या औषधाप्रमाणे काम करत असल्याचे दिसून आले आहे.
केशराचे अतिसेवन वाईट असते ?
मात्र, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आस्तिक जोशी यांनी थोडे वेगळे मत व्यक्त केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, 'केशरामध्ये मानसिक आरोग्य सुधारण्याची क्षमता आहे ही बाब जरी खरी असली तरी, यावर झालेला बहुतांश अभ्यास पुरेसा नाहीये. त्यामुळे नैराश्यावरच्या मुख्य उपाय म्हणून केशराचा वापर करणे योग्य ठरणार नाही. डॉ. जोशी यांच्या मते, सोशल मीडियावर जे दावे केले जात आहेत, ते अनेकदा अतिरंजित असतात. नैराश्य दूर करण्यासाठी केशर एक 'नैसर्गिक' उपाय म्हणून ऐकायला चांगला वाटत असला, तरी केशराचे अतिसेवन हे शरीरासाठी त्रासदायर ठरू शकते. केशराचे जास्त सेवन केल्याने चक्कर येणे किंवा मळमळ होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात असे डॉ.जोशी यांचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा: चुकीच्या व्यक्तीसोबत नात्यात असाल तर स्त्रियांच्या शरीरात दिसतात ही 10 लक्षणं, दुर्लक्ष करू नका! )
तज्ज्ञांच्या मते, नैराश्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय केशरचे सेवन करू नये. आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधाला केशर हा पर्याय ठरू शकत नाही. जर तुम्हाला नैराश्याची कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केशर हा नैराश्यावरील उपचाराचा एक सहायक भाग असू शकतो, पण तो मुख्य उपचार नव्हे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
डॉक्टरांच्या सल्ला महत्त्वाचा
थोडक्यात, सोशल मीडियावर केशराबद्दल जे दावे केले जात आहेत, ते पूर्णपणे सत्य नाहीत. केशरामुळे नैराश्याची सौम्य लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते, पण ते नैराश्यावर रामबाण उपाय नाही. गंभीर मानसिक समस्यांसाठी व्यावसायिक उपचारांची गरज असते. त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक उपायाचा अवलंब करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world