जाहिरात
Story ProgressBack

Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी

Mother's Day Special : आई होणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, असा अर्थ नव्हे. बाळासह आपण स्वतःचीही देखभाल करण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. कारण...

Read Time: 3 min
Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी

Guide For New Mother: आई या शब्दात जितकी माया-प्रेम-आपुलकी आहे, तितकेच आई (Mother's Day 2024) होणे ही मोठी जबाबदारी आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर महिला एका नव्या जगामध्ये प्रवेश करते. जेथे सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा तिचा सर्व वेळ बाळाच्या अवतीभोवती फिरत असतो. आपल्या बाळाची योग्य पद्धतीने देखभाल कशी करता येईल, याचाच विचार आई दिवसभर करत असते. बाळाला दूध पाजण्यापासून ते आंघोळीपर्यंतच्या सर्व गोष्टींचे वेळापत्रक आई निश्चित करते. बाळाची काळजी घेताना आईचे मात्र स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. यामुळे तिच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. आई होणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी न करणे, असा या नात्याचा अर्थ होत नाही. मुलाची काळजी घेण्यासोबतच प्रत्येक महिलेने स्वत:साठीही वेळ काढलाच पाहिजे. नवमातांनी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

नवमातांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? 

स्वतःसाठी वेळ काढावा

तुमच्या दिनचर्येमध्ये केवळ मातृत्वाच्याच जबाबदाऱ्यांचा समावेश असेल तर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चूक करताय, हे लक्षात घ्या. भविष्यातील गंभीर परिणाम टाळण्यासाठी तुम्ही दिवसभरातील एक तास स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न करावा. या कालावधीमध्ये कुटुंबातील सदस्यांना बाळाची काळजी घेण्यास सांगावे. तुम्ही आई झाल्यानंतर एखादे पुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे किंवा स्वतःचे छंद जोपासण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये. स्वतःला प्राधान्य द्यायला विसरू नका.

(नक्की वाचा: तिशीनंतरही दिसला तरुण, सुरकुत्याही होतील कमी; या खाद्यपदार्थांमुळे वाढेल कोलेजन)

झोप पूर्ण घ्यावी

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने किमान सात तास झोपणे आवश्यक असते. पण नवजात बाळामुळे आईला पुरेशा प्रमाणात झोप घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या बाळासोबत किमान नऊ ते 10 तासांचा वेळ अंथरुणामध्येच घालवण्यावर लक्ष केंद्रीत करावे. जेणेकरून तुमची सात-आठ तासांची झोप पूर्ण होण्यास मदत मिळेल. जेव्हा तुमचे बाळ झोपलेले असेल तेव्हा आपण देखील झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. यादरम्यान घरातील सदस्यास बाळावर लक्ष ठेवण्यास सांगावे. 

(नक्की वाचा: सावधान! या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला येतेय जास्त झोप, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश)

शरीर हायड्रेट ठेवणे 

नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी शरीरामध्ये ऊर्जा तसेच तुमच्यामध्ये संयम असणे फार गरजेचे आहे. शरीर हायड्रेट राहील, याची पुरेपूर काळजी घ्यावी. याकरिता जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. पाण्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीराचे वजन देखील नियंत्रणामध्ये राहण्यास मदत मिळेल.  

 (नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)

बदलांचा स्वीकार करावा

पहिल्यांदाच मातृत्व अनुभवणाऱ्या कित्येक महिला त्यांच्या जीवनामध्ये होणाऱ्या बदलांमुळे घाबरतात. शारीरिक बदलांचा स्वीकार करणे त्यांना कठीण ठरते, याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मातृत्वामुळे जीवनात झालेल्या नव्या बदलांचा हसतमुखाने स्वीकार करावा. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे मानसिक दडपण जाणवणार नाही. मानसिक तणाव येत असल्याचे तुमच्या पार्टनरशी संवाद साधवा अथवा जवळच्या मित्र-मैत्रिणीसमोर आपले मन मोकळे करावे.    

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

VIDEO: Kids Health बड्या कंपन्यांच्या हेल्थ ड्रींक मुलांसाठी घातक?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination